रत्नागिरी : राज्यातील सर्वाधिक पाऊस हा कोकणात पडतो. इतकेच नव्हे, तर देशातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये कोकणचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, धरणे भरतात, पूर येतो तरीही कोकणाला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवावे लागते. पाणीटंचाई हा जिल्ह्यासाठी ‘शाप’च ठरला असून, आजही जिल्ह्याची ‘घागर उताणीच राहिली’ आहे.
कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. साधारण सरासरी ३ हजार ते ३ हजार पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. असे असले तरी कोकणाला पाणीटंचाईचा सामना करावाच लागतो. साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडूनही दरवर्षी जिल्ह्यात शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवावे लागते. विशेष म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा हा पाऊस तीन पट जास्त आहे. पण, पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी नद्यांच्या पुरांना सामना करावा लागतो. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही ते साठवता न येण्यामागे भौगोलिक कारणही सांगितले जाते. कारण कोकणातील लाल मातीचे पाणी साठवण क्षमता कमी आहे.
डोंगरामुळे तसेच कातळ जमीनमुळे पाणी वाहून जाते. या कारणांचा यामध्ये समावेश होतो. असे असले तरी जे पावसाचे पाणी पडते त्यांचे योग्य नियोजन केले जात नाही, हे ही तितकेच वास्तव आहे.
मुळात रत्नागिरी जिल्ह्यात धरणे, बंधारे यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी सरकारसह जनताही उदासीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी ११२ गावातील २९७ वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागले होते. गतवर्षी २१ फेब्रुवारीला लांजा तालुक्यात पहिला टँकर धावला होता. १५ जुनपर्यंत ११२ गावात टँकर धावत होते. ७० हजार नागरीकांना या पाण्यावर अवंलबून रहावे लागले होते. ह्यावर्षी ३५७गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, अशी दाट शक्यता आहे. तसा संभाव्य पाणी टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ३५७ गावातील ७१२ वाड्यांचा समावेश आहे.
लोकप्रतिनिधीसुद्धा गप्पच…
या पाणीटंचाईला गेली कित्येक वर्ष रखडलेले लघू सिंचन व मध्यम योजनांची कामे हेही थोड्या प्रमाणात कारणीभूत होत आहेत. कारण, रत्नागिरी जिल्ह्यात ५० ते ६० योजना मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ६ योजनांची कामे झाली आहेत. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसुद्धा गप्पच आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 25/Mar/2025














