संगमेश्वरातील जाखमाता आणि निनावी देवीचा आज शिंपणे उत्सव

रत्नागिरी : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले संगमेश्वर येथील देवी जाखमाता आणि निनावी देवीचे शिंपणे म्हणजेच रंगपंचमी महोत्सव. दिवसभर चालणारी लाल रंगाची उधळण आणि प्रसाद म्हणून मटण-भाकरी हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण.

फाल्गुन अमावस्येला बलिदानास योग्य दिवस पाहून शिंपणे उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या वर्षी २८ मार्चला हा उत्सव रंगणार आहे. कसबा संगमेश्वर येथील शिंपणे उत्सवाची सुरुवात व शेवट ढोल-ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्याने होते. दुपारी ३ च्या सुमारास काढला जाणारा फेरा सर्वात महत्वाचा असतो.

यात बैलगाडीमधून रंगाची पिंपे भरून ठेवली जातात. यातील लाल रंग फेऱ्यामध्ये सहभागी सर्वांवर उडवला जातो. तसेच फेऱ्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधूनही भक्तगणांच्या अंगावर पहाटे ६ वाजल्यापासूनच लाल रंगाची उधळण केली जाते.

हा उत्सव शेकडो वर्षे कसबा संगमेश्वर येथे साजरा केला जात आहे. उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात येते. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळांनी सजलेली ही मंदिरे आकर्षक दिसतात. रात्री १० च्या दरम्यान फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना हौद फोडण्यात येतो व प्रसाद वाटप करण्यात येतो.

शिस्तबद्ध रितीने मटण-भाकरीचे वाटप
मानाचा नारळ देऊन पाण्याचा प्रसिद्ध जाखमाता देवी माहेरवाशिणी व अन्य महिला वर्ग देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल होतात. दुपारनंतर सालाबादच्या रखवालीचे नवस देण्यास सुरुवात होते. यामध्ये नारळ, कोंबडे व बकरे यांचा समावेश असतो. दरवर्षी प्रत्येक व्यक्तीची रखवाली ठरलेली असते. दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात येतो. यात शिस्तबद्ध रितीने मटण-भाकरीचे वाटप करण्यात येते.

जावयाला रंगवले जाते लाल रंगात
या उत्सवात लहान मुलांना पाण्यामध्ये डुंबण्यासाठी पाण्याचे मोठे हौद बांधण्यात येतात. भक्तगणांचा सर्वाधिक उत्साह दिसतो तो दुपारी तीनच्या दरम्यान निघणाऱ्या मुख्य फेऱ्यांमध्ये, संगीताच्या तालावर हजारो पाय थिरकायला लागतात. जवळपास ४ तास हा उत्साह असाच सुरू राहतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगाने अक्षरशः न्हाऊ घालतात. उत्सवात काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरीचा प्रसाद घेतला जातो. महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 28/Mar/2025