चिपळूण : सध्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, उष्मादेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कडाक्याचे ऊन व त्यांनतर आलेला अवकाळी पाऊस या लहरी हवामानामुळे कोकणातील आंबापीक हातचे गेले आहे.
याबाबत कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून आंबा बागायतदार शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, पर्यावरणप्रेमी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
यावर्षी हवामानात मोठा बदल जाणवला. मध्यंतरी थंडीचा कडका वाढला होता. त्यानंतर अचानक हवेत उष्मा वाढला होता. त्यामुळे आंब्याला योग्य मोहोर आला नाही. आता पुन्हा उष्णतेची लाट आली.
या लाटेत राज्यात एक बळी गेला. आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. परिणामी, आंबा पिकावर संक्रात आली असताना आता पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यावर उरलासुरला मोहोर करपून गेला आहे. काही झाडांना फळधरणा झाली होती; परंतु बदलत्या वातावरणामुळे कैऱ्या गळून पडत आहेत. काही झाडावरच सुकत आहेत. यावर्षी आंबापीक हातचे गेले आहे.
काही झाडांना आता पालवी फुटली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने केलेली फवारणी, दिलेली खते वाया गेली. हा खर्चही आता वाया गेल्याने शेतकरी बागायतदार हवालदिल झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबापिकाचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देणार असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही मुकादम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 28/Mar/2025
