दापोली : मुरुड किनाऱ्यावरून कासवांची ८९ पिल्ले समुद्रात झेपावली

दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण ८९ कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. किनाऱ्यावर असलेल्या सकाळीच फिरायला आलेल्या पर्यटकांनीदेखील याचा आनंद लुटला.

मुरूड समुद्रकिनाऱ्यावर यावर्षी कासवांच्या अंड्यांची एकूण ३५ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण ३६१६ अंडी आहेत. ९८ अंडी असलेले पहिले घरटे २७जानेवारीला २०२५ संरक्षित करण्यात आले. त्या घरट्यातून २३ मार्च २०२५ रोजी ३५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली, तर ८९ अंड्यांचे दुसरे घरटे ३१ जानेवारी २०२५ रोजी संरक्षित करण्यात आले असून, त्यामधून ५४ पिल्ले २६ मार्च २०२५ रोजी समुद्रात सोडण्यात आली आहेत. दाभोळपासून केळशीपर्यंतच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीचे कासव अंडी घालण्यासाठी येतात.

दापोली वनविभाग व कांदळवन कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जीवरक्षक व कासवमित्रांच्या सहकायनि ही अंडी घरट्यांमध्ये संरक्षित केली जातात.

डॉल्फिन सफर आणि हळूहळू कासवांचे गाव म्हणून देखील मुरूड गाव प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. बुधवारी देखील पर्यटकांनी पिल्लांना समुद्रात सोडतानाचा आनंद घेतला. या वेळी जीवरक्षक राजेश शिगवण व श्याम माने यांनी या पिल्लांना समुद्रात सोडली.

२३ तारखेपासून दोन घरट्यातील एकूण ८९ कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडली आहे. आता १ किंवा २ एप्रिलला तिसऱ्या घरट्यातील पिल्ले बाहेर येतील. या घरट्यामध्ये १३४ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. या किनाऱ्यावर अजून ३३ घरटी संरक्षित केलेली आहेत. –राजेश शिगवण, मुरूड किनाऱ्यावरील जीवरक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 28/Mar/2025