आंब्याच्या परदेश वारीला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात

रत्नागिरी : गेली दोन वर्षे महाराष्ट्रातून आंबा निर्यात करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्यात आला होता. तर २०२४-२५ या हंगामात राज्यातून १९,८०० मेट्रिक टन एवढा आंबा निर्यात करण्यात आला आहे. यावर्षी आंबा हंगाम सुरू झाला असला तरी प्रमाण अल्प असल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारताने सन २०२३-२४ मध्ये ३२,१०४ मेट्रिक टन आंबा निर्यात केला होता, त्याची किंमत ४९,५४६ लाख एवढी होती. यापैकी महाराष्ट्रातून ४१,५३१ लाखाचा २५,२३० मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला होता. सन २०२४-२५ या हंगामात देशाने २७ हजार ३५ मेट्रिक टन एवढा आंबा परदेशी पाठवला असून, त्याची किंमत ४१,६४८ लाख एवढी आहे. यापैकी राज्यातून १९,८९२ मेट्रिक टन आंबा पाठविण्यात आला. त्याची किंमत ३२,३९९ लाख रुपये इतकी आहे.

नवी मुंबईतील वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रावरून परदेशात आंबा निर्यातीला सुरुवात होणार आहे. यावर्षी चार हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करण्याचे पणन मंडळाचे उद्दिष्ट आहे. आखाती देश, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या निर्यातीत दरवर्षी जपान, दक्षिण कोरिया व युरोपीय देशात हापूसबरोबर केसर, तोतापुरी, सुवर्णरखा, बेगनपल्ली यांची निर्यात होते. कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर अमेरिकन निरीक्षक दि. १ एप्रिलपासून उपलब्ध असणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 28/Mar/2025