लांजा : क्षयरोग हा मायक्रो बॅक्टेरिया टूबरक्युलसीस या जंतूमुळे होतो. हा कुठलाही दैवी कोप किंवा शाप नाही. या आजाराचा प्रसार हवेमार्फत होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा वापर करावा तसेच सार्वत्रिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहन आरोग्य निरीक्षक दिलीप वि. गुरव यांनी केले.
तालुक्यातील वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिलीप गुरव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी क्षयरोग या आजाराची लक्षणे सांगितली. आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य कर्मचारी तसेच गावपातळीवर आशासेविका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कामत, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज नवले, औषध निर्माता गणेश लकडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी मानसी मांडवकर, आरोग्यसेविका शर्वरी मोर्ये, अमर वाळंबे, पंकज कालकर उपस्थित होते. गणेश लकडे यांनी आभार मानले.
विनामूल्य थुंकी तपासणी
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तत्काळ विनामूल्य थुंकी तपासणी केली जाते. पुढील एक्स-रे करण्यासाठी एकत्रित रुग्ण गोळा करून स्वतंत्र गाडीची व्यवस्था करून तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. तसेच मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णाला एक दिवस जरी ताप, खोकला असेल तरी थुंकी तपासणी करून घ्यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 29/Mar/2025














