Ratnagiri : बदलत्या वातावरणाचा हापूसला फटका

रत्नागिरी : वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हापूसवर बुरशीजन्य आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. बागायतदारांच्या औषध फवारणीच्या खर्चातही वाढ होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत तीनवेळा वातावरण बिघडल्यामुळे यंदा २० टक्केच उत्पादन राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हापूस उत्पादकांसाठी यथातथाच राहणार आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तरअंतर्गत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार आहे. त्यामुळे जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाकडून पाऊस पडेल अशीच शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आर्द्रता अधिक असल्यामुळे उष्म्याची तीव्रता अधिक जाणवत होती. या वातावरणाचा सर्वाधिक फटका हापूसला बसला आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील फळ तयार होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीत आभाळ भरून आल्यामुळे कीडरोग वेगाने पसरणार आहेत. झाडावरील एकमेकाला जोडून आलेल्या फळांमध्ये डाग तयार होणार आहेत. पोखरणाऱ्या अळीमुळे फळाचा दर्जा घसरणार आहे.
सध्या हापूसचे उत्पादन कमीच असताना वातावरणातील बदलांचे बागायतदारांपुढील संकट कायमच आहे. यंदा फेब्रुवारीत ५ टक्केही उत्पादन मिळालेले नाही.

मार्च महिन्यात ३० टक्केची पेट्यांची आवक बाजारात होती. एप्रिलच्या सुरुवातीलाही आवक कमीच राहणार आहे. या परिस्थितीत वातावरणातील बदल हापूस उत्पादनाला मारक ठरत आहेत. सध्या वाशी बाजारात आवक कमी असल्यामुळे दर स्थिर आहेत.

वाशीत अवघ्या १५ हजार पेट्या
गेले दोन दिवस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून सलग दोन दिवसांत ७४ हजार पेटी आंबा वाशी बाजारात पाठविण्यात आला होता. मात्र, काल वाशीमध्ये अवघ्या १५ हजार पेट्या गेल्या आहेत. यावरून यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे दिसत आहे. १५ एप्रिलनंतर आवक थोडीफार वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ढगाळ वातावरणाचा हापूसवर मोठा परिणाम होणार आहे. फळाच्या दर्जावर परिणाम होईल. त्यासाठी फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागत आहे- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 01/Apr/2025