दापोली : दापोली तालुक्यातील दाभोळ येथून दापोलीकडे येणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे या चालकाने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात बस थांबवून प्रवाशांचा जीव वाचविला. ही घटना गुरुवारी ३ रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास वळणे येथे घडली.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल भाऊराव धोत्रे हे त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक एमएच.१४ बीटी -१४८८ घेवून दाभोळ ते दापोली या दिशेने येत होते. दरम्यान, त्यांची बस वळणे येथे आली असता त्यांनी गाडीचा ब्रेक मारला. मात्र, बस थांबली नाही. या बसचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने गाडी थांबविण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गटारात बस उतरवली.
त्यामुळे झालेल्या या अपघातात बसमधून प्रवास करणारे काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यात एसटी बसचे अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची खबर दापोली पोलीस ठाण्यात चालक राहुल भाऊराव धोत्रे यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 04/Apr/2025














