रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहामध्ये ७० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण ४६ पदे वसतिगृहासाठी मंजूर करण्यात आली आहेत. असे असतानाही केवळ १३ पदेच भरण्यात आली आहेत.
वसतिगृहासाठी कंत्राटी पहारेकरी व सफाई कर्मचाऱ्यांची प्रत्येक चार पदे मंजूर असताना एकही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येच समाजकल्याण विभागाचा गाडा चालविला जात आहे.
रत्नागिरी समाजकल्याण विभागांतर्गत जिल्हाभरात एकूण १० वसतिगृहे चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये ४ मुलींच्या वसतिगृहाचा समावेश आहे.
एकूण २०० विद्यार्थी या वसतिगृहामध्ये वास्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची कमतरता असणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर तसेच त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर परिणाम करणारे आहे. जिल्हा समाजकल्याण विभागाचा एकूण ४६ पदे मंजूर झाली आहेत. त्यामध्ये १९ पदे विविध संवर्गातील आहेत.
यामध्ये गृहपालची १० पदे मंजूर असून केवळ ३ पदे भरण्यात आली आहेत, तर कनिष्ठ लिपिकांची ९ पदे मंजूर असून एकही पद भरण्यात आलेले नसल्याची बाब समोर आली आहे.
मागील काही दिवसात जिल्हा समाजकल्याण विभाग विविध कारणांनी चर्चेत असल्याचे दिसत आहे. २६ जानेवारीला समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात कर्मचाऱ्यामध्ये मारहाणीचा प्रकार समोर आला होता. तसेच नुकतेच समाजकल्याण विभागाचे कुवारबाव येथील वसतिगृहात विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केलो होती. त्यामुळे समाजकल्याण पुरेस कर्मचारी बळ असणे अत्यावश्यक असतानाही प्रत्यक्षात ७० टक्के इतकी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 03/Apr/2025














