गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी वेळंब फाट्याजवळील नाल्यात सांडपाणी सोडण्यात येत असल्याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर प्रशासनाने दूषीत पाण्यासंदर्भात शृंगारतळीमधील हॉटेल व्यावसायिक, निवास संकुले अशा ३८ जणांना नोटीस पाठविल्या आहेत. नदीपात्रात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवावे; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

गत दोन वर्षांपासून शृंगारतळी वेळंब फाट्यानजिकच्या नाल्यात सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरू होता. या बाबत सातत्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या. या ठिकाणचे पाणी हे पिण्यास व वापरास धोकादायक असल्याचा अहवालही आरोग्य विभागाने दिला होता. मात्र, तरीही सांडपाणी सोडण्याचा प्रकार सुरू होता. यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे ग्रा.पं.च्यावतीने ३८ जणांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
शृंगारतळी बाजारपेठेच्या दोन्ही बाजूने दोन नाले आहेत. या नाल्यांमध्येच सर्व सांडपाणी सोडले जात असल्याने दोन्ही नाले दूषीत झाले आहेत. त्यापैकी वेळंब फाट्याजवळील नाल्यातील दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नाल्याच्या परिसरात राहाणाऱ्या लोकांच्या विहिरी, बोअरवेल दूषीत झाले. हे पाणी पिण्यासच नव्हेतर आंघोळीसाठी किंवा अन्य वापरासाठी देखील वापरणे धोकादायक असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला.
या दूषित पाण्यामुळे येथील लोकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी दोन वर्षात अनेक तक्रारी केल्या. परंतु त्यांना दाद मिळत नव्हती. ग्रामस्थांनी सांडपाण्याची गटारे बुजवून टाकण्याची व नाल्यातच आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने पहाणी केली. ग्रामपंचायतीने नाल्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे फोटो, व्हिडिओ आदी गोष्टींचे चित्रीकरण केले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामपंचायतीने ३८ जणांना दंडात्मक कारवाईच्या नोटीसा पाठवल्या आहेत.
दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत पंचायत समितीमध्ये बैठक आयोजित केली आहे. या बाबत पाटपन्हाळे ग्रामपंचायत उपसरपंच असीम साल्हे यांना विचारले असता ते म्हणाले, सुरुवातीला केवळ ३८ नोटीसा पाठवल्या होत्या. आता या नोटीसांची संख्या आहे. ४५ वर पोहोचली
कायमस्वरुपी उपाययोजना गरजेची
आम्हाला नोटीस मिळाली आहे. मात्र आम्ही हॉटेल व लॉज सुरू करतानाच एक छोटा जलशुध्दीकरण प्रकल्प बांधला होता. तो आजही कार्यान्वित आहे. शिवाय शौचालयाचे खड्डे आम्ही उपसून त्यातील पाणी दुसरीकडे नेऊन टाकतो. त्यामुळे आमच्या व्यवसायातून नदीत जाणारे पाणी बऱ्यापैकी शुद्ध असते. मात्र यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचे सहकार्य नक्की असेल, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिक ओंकार संसारे यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 05/Apr/2025














