रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉ. पी. व्ही. काणे रत्नागिरीत उपकेंद्र यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
संस्कृत भाषा आणि साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, प्राचीन भारतीय विज्ञान, भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृत माध्यमाने समाजोपयोगी उपक्रम या सर्व क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्थांच्या एकत्र सहकार्याने विविध उपक्रम आयोजित करणे हे या सामंजस्य कराराचे मुख्य उद्देश आहेत. या अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. भविष्यात या कराराअंतर्गत सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, सेमिनार, वर्कशॉप, संशोधन प्रकल्प यांचे संयुक्तपणे आयोजन केले जाणार आहे. यापूर्वीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रामध्ये सामंजस्य करार झाला होता. या कालावधीत संयुक्त विद्यमाने धर्मशास्त्र विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भारतीय कालगणना वर्ग, सरलमानक कार्यशाळा, गणित कार्यशाळा, भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, बंगळूरच्या चाणक्य विद्यापीठ बंगळूरचे डॉ. विनायक रजत भट, सामंजस्य करार समन्वयक प्रा. कश्मिरा दळी, ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी उपस्थित होते. डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविक आणि महाविद्यालयाचा परिचय करून दिला. डॉ. दिनकर मराठे यांनी मागील सामंजस्य करारांतर्गत झालेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यावर चर्चा होऊन नवीन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्कृत भाषा संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी दोन्ही संस्था सतत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना अधिकाधिक उत्तम शैक्षणिकआणि संशोधन संधी रत्नागिरीत उपलब्ध व्हाव्या आणि दोन्ही संस्थांचे सहकार्य वृद्धिंगत व्हावे, यासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या करारावेळी संस्कृत विभागाच्या प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट आणि डॉ. पी. व्ही. काणे उपकेंद्राचे प्रा. अविनाश चव्हाण उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 05-04-2025













