लांजा : आसगे येथे नागरिकांनी रोखली चिरे वाहतूक

लांजा : रस्त्याचे काम सुरू असून रस्ता पूर्ण होण्या आधीच मार्गावरून बिनधास्तपणे चिरे वाहतूक करणाऱ्या १० ते १२ अवजड वाहनांना अडवून धरत नागरिकांनी वाहतूक रोखल्याची घटना गुरुवारी रात्री १० वा. च्या दरम्यान लांजा तालुक्यातील आसगे येथे घडली. यावेळी अरेरावी करणाऱ्या ट्रक चालकांना नागरिकांनी चांगलीच ताकीद दिली. ट्रक अडवून धरल्याने आसगे येथे चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची लांबलचक रांग पहायला मिळाली. काहीकाळ झालेल्या बाचाबाचीमुळे वातावरण तंग झाले असताना मात्र नागरिकांनी आपला राग शांत ठेवत ट्रक चालकांना समज देऊन सोडून दिले.

लांजा तालुका कोल्हापूर जिल्हाला जोडलेल्या आसगे-तळबडे-कुरचुंब-साखरपा मार्गावर ६ महिन्यापूर्वी अवजड वाहनांचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या मार्गावरील अवजड चिरे वाहतूक बंद करून वाहतूक पाली मार्गे वळवण्याच्या सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा राजरोसपणे चिरे वाहतूक करणाऱ्या १६ चाकी अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने देवधे, आसगे, तळवडे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवधे व आसगे येथील नागरिकांनी क्षमतेपेक्षा जास्त चिरे वाहतूक करणारे तब्बल १२ ट्रक गुरुवारी रात्री अडवून धरले होते. यावेळी नागरिक व ट्रक चालक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाला जोडलेल्या देवधे आसगे मार्गाचे सद्या
रुंदीकरणाचे काम प्रगती पथाकडे असून काम पूर्ण होण्या आधीच या मार्गावरून बिंधास्तपणे चिरेवाहू अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.

या अवजड वाहतुकीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे लांजा-आसगे-तळवडे-कुरचुंब मार्गानेही जांभा चिरा वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील दोन्ही मार्गाने परजिल्ह्यात चिरे वाहतूक सुरू आहे.

रस्त्याचे काम सुरु असल्याने देवधे आसगे मार्गावरून सुरू असणारी अवजड वाहतूक तत्काळ बंद करावी अशी मागणी देवधे, आसगे ग्रामस्थांनी केली आहे. लांजा बाजारपेठ, वाहनांची गर्दी व संबंधित प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी अवजड वाहतूक देवधे-आसगे मार्गावरून दिवसेंदिवस चिरे वाहतूक वाढली आहे. यामुळे लांजा-तळवडे-दाभोळे रस्त्याची अवजड वाहनांमुळे आसगे, तळवडे व कुरचुंब या भागांमध्ये दुरवस्था झाली आहे. तळवडे खिंड येथील अवघड वळणावर मोठ मोठे खड्डे पडल्याने रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 05/Apr/2025