रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोडवर आकाशवाणी केंद्राच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या पाण्याच्या व्हॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची बातमी “रत्नागिरी खबरदार”ने काल प्रसिद्ध केली होती. या बातमीची नगरपालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी तात्काळ दखल घेत गळती लागलेला व्हॉल्व्ह बदलण्याची कार्यवाही केली. नगरपालिकेच्या या त्वरित कारवाईमुळे पाण्याचा अपव्यय थांबला असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
थिबा पॅलेस रोडवरील आकाशवाणी केंद्राबाहेरील व्हॉल्व्हमधून गळणाऱ्या पाण्यामुळे परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती. या गळतीमुळे पाणी इतरत्र पसरणार नाही यासाठी तिथे एक पिशवीही लावण्यात आली होती, परंतु तरीही पाण्याचा अपव्यय थांबत नव्हता. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला होता. एकीकडे पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र दिसत होते.
नगरपालिकेने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने नवीन व्हॉल्व्ह बसवला आहे. यामुळे आता पाण्याची गळती पूर्णपणे थांबली असून, पाण्याचा अपव्यय टळला आहे. या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.














