आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे : मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : “सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणाव असतो आणि तो कसा कमी करता येईल, आरोग्यदायी जीवन कसे जगता येईल, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे व अशा कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वाना ताणतणाव कमी करण्यास नक्कीच फायदा होईल,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे प्रतिपादन केले.

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, जिल्हा माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिरे, प्रभात फेरी, चर्चासत्र, आरोग्य कार्यक्रम व आरोग्य योजनेंची माहितीपर सत्र, गरोदर माता तपासणी शिबिरे, असंसार्गिक कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.

या कार्यशाळेचे वक्ते आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संजयकुमार कलगुटगी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना ताणतणाव म्हणजे काय, त्याचे प्रकार व तो कसा नियंत्रणात आणावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या ताण-तणावाबाबत असणाऱ्या शंकाचे निरसन केले. स्वीय सहाय्यक दिनकर सिनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. महेंद्र गावडे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 08/Apr/2025