गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे येथील लोकवस्तीमधून जिंदल कंपनीचे गॅस टर्मिनल स्थलांतरित व्हावे, या मागणीकरिता बेमुदत धरणे आंदोलनाबाबतच पत्र बुधवारी नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने रत्नागिरी येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे बेमुदत धरणे आंदोलन नांदिवडे येथे सध्या जिंदल गॅस टर्मिनलचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या बेमुदत धरणे आंदोलनासाठी नांदिवडे येथील प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीला व स्थानिक ग्रामस्थांना सर्वोच्च न्यायालयातील नामवंत वकील असीम सरोदे, माजी मंत्री बच्चू कडू, कायदेशीर सल्लागार अॅड. रोशन पाटील, अॅड. महेंद्र मांडवकर आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या बेमुदत धरणे आंदोलनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे निवेदन देताना प्रदूषणविरोधी संघर्ष कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीतर्फे येत्या १४ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती आक्रमक
नांदिवडे येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी गॅस टर्मिनलमुळे वायू गळतीची मोठी दुर्घटना घडली होती. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला होता. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी मोठी आंदोलने केली. तसेच हा गॅस टर्मिनल प्रकल्प लोकवस्तीतून हटवण्यासाठी सातत्याने मागणी केली. मात्र, तरीदेखील हा प्रकल्प जिंदल कंपनीने हटवलेला नसल्याने प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती आक्रमक झालीय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 10/Apr/2025














