दापोली : पर्यटन तालुका असल्याने हापूस आंब्याच्या हंगामात पुणे, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांतून पर्यटक खास दापोलीतील हापूस आंबा खरेदीसाठी येतात. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाची जोड देऊन घेतलेले हापूस आंब्याचे पीक असा खात्रीशीर आंबा दापोलीतील हापूसची ओळख आहे. त्यामुळे पर्यटक बिनधास्त खरेदी करतात, तर याच चवदार आंब्याची चव पर्यटकांच्या जिभेवर असते; मात्र या वर्षी दापोलीतील हापूसची चव चाखता येईनाशी झाली आहे.

दरवर्षी पेक्षा या वर्षी उत्पन्नात अधिक घट झाल्याने हे उत्पन्न २० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे याच कमी उत्पन्नाची या वर्षी दापोलीतील शेतकरी व बागायतदार यांना कोट्यवधी रुपयांना झळ बसणार असून आर्थिक गणित देखील बिघडणार आहे.
दरवर्षी मुंबई वाशी मार्केट आणि पुणे या सारख्या शहरात येथील हापूस हा मुबलक प्रमाणात विक्रीसाठी जातो. वाजवी दर असल्याने खासगी कंपन्या, खवय्ये अशी मोठी खरेदी असते, अक्षय्य तृतीयासाठी आठवडाभर आधीच रत्नागिरीतील त्यात दापोलीतील हापूसची या शहरातून बुकिंग असते. मात्र, या वर्षी उत्पन्नात कमालीची घट झाल्याने हापूस खरेदी खवय्यांच्या खिशावर भार टाकणार आहे. दापोलीत सध्या चांगला प्रतीच्या आंबा पेटीसाठी १७०० ते १८०० रुपये मोजावे लागत आहे तर डझनचा भाव ९०० रुपयांपर्यंत आहे.
मागील काही वर्षे नैसर्गिक संकटाने शेतकरी आणि बागायतदार आर्थिक संकटात आहे. दरवर्षी हापूसचे १०० टक्के उत्पन्न नसले, तरी जेमतेम आर्थिक गणिताची जुळवणूक होत होती. मात्र, २०२४ आणि २५ हे वर्ष अनेकांसाठी आंबा पीक म्हणून वांझ गेले, असे म्हटले तर गैर ठरू नये. तालुक्यात काही ठरावीक ठिकाणी हापूस उत्पन्न वगळता बहुतेक ठिकाणी झाडाला फक्त पालवी दिसत आहे. त्यामुळे या वर्षी आंबा कॅनिंगला तुटवडा भासणार असे दिसत आहे. बदलते हवामान, वांझ मोहर अशा विविध कारणांमुळे हापूस आंब्याचे उत्पन्न घटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 11/Apr/2025














