चिपळूण : गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आता राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (रामिम) महाएल्गारची घोषणा केली आहे. या संदर्भात १५ एप्रिल रोजी रामिमच्या (परेल) सभागृहात सायंकाळी ४ वा. गिरणी कामगार व वारसांच्या सभेत अथवा त्यानंतर आंदोलनाची तारीख जाहीर होईल, असे अध्यक्ष व आमदार सचिन अहीर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले.
तसेच कोकण परिसरात वास्तव्यास असणाऱ्या गिरणी कामगार व वारसांमध्ये जनजागृतीसाठी दि. १७ ते २१ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने पोलादार चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, सावंतवाडी येथे सभा होणार आहेत.
दरम्यान, महाएल्गार आंदोलनास विशाल रूप यावे यासाठी कामगार संघटना, नेते व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुंभार्लीचे (ता. चिपळूण) सुपुत्र सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले आहे. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न रखडत चालला आहे. यामुळे कामगार व वारसांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या संदर्भात गुरुवारी रामिम संघामध्ये
तातडीची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष आ. सचिन अहीर यांनी महाएल्गारच्या घोषणेला मान्यता दिली.
दरम्यान, कोकणातील गिरणी कामगार व वारसांमध्ये जनजागृतीसाठी दि. १७ ते २१ एप्रिल दरम्यान गिरणी कामगार व वारसांच्या सभा होणार आहेत. दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील काझी शहाद्दिन हॉल, एस.टी. डेपोच्या मागे, त्याच दिवशी दुपारी ३ वा. कणकवलीत शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली रेल्वे स्टेशन येथे, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दुपारी ३ वाजता लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालय, लांजा एस.टी स्टॅण्डसमोर, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण शहरातील स्व. लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृह दुपारी २ वाजता पोलादपूर येथे कॅप्टन विक्रम मोरे हॉल, पोलादपूर महाबळेश्वर रोड, एस.टी.स्टँडच्या बाजूला कामगार आणि वारसांची सभा होणार आहे.
संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ (अण्णा) शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे सभा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
घरांसाठी अजून किती वर्षे…
घरांसाठी १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत फक्त १८ हजार कामगारांनाच घरे मिळाली आहेत. उर्वरित १ लाख ५० हजार कामगारांना घरे मिळण्यास किती वर्षे लागणार आहेत, असा संतप्त सवाल या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 14/Apr/2025














