केवळ बाबासाहेबांमुळेच देश एकसंघ : सुनील कांबळे

रत्नागिरी : स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे देशात विविध, जाती, धर्म, भाषा, प्रांत असतानादेखील भारत एकसंघ राहिला तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळेच, असे मत माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख, अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी मांडले.

नेहरू युवा केंद्र, ग्रामजीवन आधार संस्था आणि द यश फाउंडेशन माने नर्सिंग कॉलेज ऑफ रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सिंग कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या प्रज्ञा, शील आणि करुणा या विचाराने देशाची प्रगती झाली, असेही ते म्हणाले.

द यश फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाळासाहेब माने यांचे स्वागत व सत्कार नेहरू युवा केंद्राचे प्रमुख मोहित कुमार यांनी संविधान प्रस्तावना, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. या कार्यक्रमात माने नर्सिंग कॉलेजच्या मुलांनी भीम गीत सादर केले व चार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य संकेत सर, ग्रामजीवन आधार संस्थेचे कुंडलिक कांबळे, नर्सिंग कॉलेज सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 15-04-2025