रत्नागिरी : हातिस-तोणदेवासीयांची गेली अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वाला जात असून, काजळी नदीवर किरबाग येथील पूलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या जोडरस्त्याचे काम झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पूल वाहतुकीला खुला होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ६ कोटी रुपयांचा निधी या पुलासाठी उपलब्ध करुन दिला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख हे ठिकाण धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. पण याठिकाणी भाविक, पर्यटकांना जाण्यासाठी रत्नागिरीतून काजरघाटीमार्गे टेंबेपूलहून सुमारे ७ ते ८ कि.मी. अंतर पार करून जावे लागते. तर सोमेश्वरमार्गे तोणदे गावातून काजळी नदीतून होडीमधून भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. पण पावसाळ्यात नदीतून प्रवास मात्र धोकादायक असतो. या पुलामुळे आता हातिसला जाणाऱ्या ग्रामस्थ व भाविकांना पर्यायी मार्ग तयार होत आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी किरबाग येथे सहा कोटी खर्च करुन नवीन पुलाची उभारणी केली आहे. ८० मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता सुमारे दीड कोटी रुपये खर्च करुन जोडरस्ता तयार करण्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ अंतर्गत हे काम मार्गी लावण्यात येत आहे.
या पुलामुळे हातिस येथील पीर बाबरशेख ऊसविळी होणारी वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीत येताना पडणारा वळसाही कमी होणार आहे. गेली अनेक वर्ष या भागात तोणदे ते हातिस गावाला जोडणारा पूल व्हावा, अशी मागणी होत होती. मात्र किर बाग येथील पुलामुळे ग्रामस्थांचे पुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 22/Apr/2025














