पाचल : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या महत्वाकांक्षी प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचे गाव या योजनेनुसार राजापूर तालुक्यातील तळवडे या गावाची मधाचे गाव साठी निवड झाली आहे. पितांबरी कंपनी सुगंधी समृद्ध कोकण विकास मंच, ग्रामपंचायत तळवडे आणि खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जात आहे.

या संदर्भातील सर्व आवश्यक ठराव ग्रामपंचायत स्तरावर व शासन स्तरावर मंजूर झालेले आहेत. नुकतेच तळवडे येथे पितांबरी उद्योग समूहाच्या सभागृहात पाच दिवसांचे मधुमक्षिका पालन प्रशिक्षणही प्रशिक्षक हेमंत डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये मधमाशांची प्राथमिक ओळख, विविध प्रजाती, महत्व, मधमाशांची कार्यप्रणाली, त्यांचे खाद्य, संगोपन, उपचार यांसारख्या अनेक बाबी प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आल्या. परिसरातील अनेकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
तत्पूर्वी पितांबरी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. रविंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने गावात प्रायोगिक तत्वावर २० मधमाशांच्या पेट्या आणून त्याद्वारे मध संकलनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. खादी व ग्रामोद्योगचे विविध अधिकारीही गावात येऊन इथल्या वनसंपदेच्या आधारे गावात चांगल्या प्रकारे मधमाशी पालन होऊ शकते या गोष्टीला दुजोरा दिला. मधाचे गाव उभारणीसाठी शासनाचे ५४ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे. यातून प्रशिक्षण, मधमाशीच्या पेट्या, विविध पायाभूत सोयींची उभारणी यांसारख्या गोष्टी करता येऊ शकतात.
खादी व ग्रामोद्योगचे सभापती रविंद्र साठे (राज्यमंत्री दर्जा) यांचाही तळवडे दौरा निश्चित झाला असून लवकरच ते तळवडे गावाला भेट देऊन इतर सोपस्कार पूर्ण होतील. मधाचे गाव या प्रकल्पामुळे गावाला नवीन ओळख तर मिळेलच आणि त्याबरोबर गावात मधूक्रांती होऊन आर्थिक उत्पन्नाचे नवे पर्याय ग्रामस्थांना उपलब्ध होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 22/Apr/2025














