राजापूर : धोपेश्वर खंडेवाडीतील दरडग्रस्त भागातील ग्रामस्थांचे पुनर्वसन प्रश्न लटकला

राजापूर : शहरानजीक धोपेश्वर गावातील खंडेवाडीत दरडग्रस्त भागात अतिवृष्टीत दरड कोसळून ग्रामस्थांच्या जीवाला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी शासनाकडून या ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा पर्याय निवडण्यात आला आहे. यासाठी ५ एकर जागाही स्थानिक ग्रामस्थांनीच उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले आहे. मात्र, या आपदग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी काढून त्याच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावरून तो परत पाठवण्यात आल्याने खंडेवाडीतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लटकला आहे.

पुनर्वसन करणेकामी संबंधित ग्रामस्थांची जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी २४ ऑगस्ट २०२१ चे पत्रात नमूद केल्याप्रमाणे माहिती संकलित करण्यात आली. तसेच त्यांचे पुनर्वसनकामी मौजे धोपश्वर खंडेवाडी येथील ग्रामस्थ बांदिवडेकर यांनी नं. १७/१ ही त्यांचे मालकीची ५ एकर जागा मोबदला घेऊन पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली. बांदिवडेकर यांनी त्याबाबतचे संमतीपत्र राजापूर तहसीलदार कार्यालयाकडे सादर केलेले आहे. राजापूर तहसीलदार कार्यालयाकडून पुर्तता करून हा पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तर जिल्हाधिकारी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र शासनाकडून या प्रस्तावात अनेक त्रुटी काढण्यात आला तो परत जिल्हाधिकारी यांच्याकडे पूर्ततांसाठी पाठवण्यात आला आहे.

यामध्ये या गावाचे पुनर्वसन हे शासकीय जागेवर करण्यात येणार आहे की खासगी जागेवर याचा उल्लेख नाही. या गावात आत्तापर्यंत नागरी सुविधा कामासाठी एकूण किती खर्च करण्यात आला आहे, याचा तपशील सादर करण्यात आला नाही. या गावात मिटिगेशनच्या अनुषंगाने आतापर्यंत कोणकाणत्या उपाययोजना करण्यात आल्या व त्यासाठी आत्तापर्यंत किती खर्च करण्यात आला आहे. यातही मिटिगेशनच्या मोजमापासाठी कोणत्या गाईडलाइन्स आहेत त्या अंतर्गत कोणकोणती कामे केली आहेत त्याचा त्या प्रस्तावात उल्ल्लेख नाही.

हे गाव भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला गाव/वाडी कोणत्या वर्गवारीमध्ये येत असल्याचे नमुद केले नाही. पुनर्वसनाची योजना तयार करताना बाधित लोकांचे उपजिवीकेवर पुनर्वसनामुळे नकारात्मक प्रभाव असेल तर प्रभावाच्या सौम्यीकरणाचे उपाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण यांच्या प्रस्ताव समावेश केलेला नाही. या करावयाच्या पुनर्वसित गावात पुरवावयाच्या नागरी सुविधेसाठी तसेच पुनर्वसित गावठाणासाठी एकूण खर्चाचा तपशिल जोडलेला नाही. अशा अनेक त्रुटी काढून शासनाकडून हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त नमूद त्रुटीच्या अनुषंगाने परिपूर्ण माहीत कारण मिमांसेसह व नागरी सुविधांच्या कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसह तथा आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करावे, असे लेखी कळवण्यात आले आहे.

शासनाकडून या पुनर्वसन प्रस्तावाबाबत एकूणच काढण्यात आलेल्या त्रुटी पहाता, त्याची प्रशासन कशा प्रकारे पुर्तता करते व पुन्हा परिपुर्ण प्रस्ताव शासनाकडे कधी पाठवते यावरच खंडेवाडीतील ग्रामस्थांचे पुनर्वसन अवलंबून आहे. त्यामुळे यावर्षीच्या अतिवृष्टीतही खंडेवाडीतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या परिसरात वावरावे लागणार आहे. तर प्रशासनाला पुन्हा एकदा या ग्रामस्थांचे पावसाळयात तात्पुरत्या स्थलांतराची तयारी करावी लागणार आहे, एवढे मात्र नक्की.

सन १९८९ पासून होतेय तात्पुरते स्थलांतर…
राजापूर शहरानजीक असलेल्या धोपश्वर गावातील खंडेवाडी हा भाग वर्ग-दोन जास्त ते मध्यम धोकादायक गाव म्हणून भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथक पुणे यांनी घोषित केले आहे. खंडेवाडीतील ग्रामस्थांच्या घराशेजारचा भाग २२ व २३ जुलै १९८९ च्या अतिवृष्टीने धोकादायक झाल्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांना सन १९८९ मध्ये तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले होते. तेव्हापासून हा भाग आपदग्रस्त म्हणून गणला जात आहे. या ठिकाणी एकूण २७घरे ही दरड प्रवण क्षेत्रात आहेत. त्यांची लोकसंख्या ही २४५ इतकी आहे. दरवर्षी पावसाळयात अतिवृष्टीच्या काळात या सर्व ग्रामस्थांचे शहरात श्री मंगल कार्यालय अथवा रानतळे येथील इंग्लिश मीडिअम स्कूल या ठिकाणी प्रशासनाकडून स्थलांतर केले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 28/Apr/2025