चिपळूण : तालुक्यातील आकले गावात मागील वर्षभर बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रत्नागिरी जिल्हा उपजिल्हाप्रमुख स्वप्नील जाधव यांनी केली आहे. आकले गावातील बिबट्याच्या दहशतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गावात जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. गावातील काही ग्रामस्थांनी बिबट्याने मारलेल्या गुरांच्या नुकसानीपोटीच भरपाई मिळावी, यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
गुरववाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, कातकरवाडी, तळेवाडी, कांगणेवाडी, गजमलवाडी, निंबारेवाडी, जुनावडेवाडी, धामणखोरीवाडी आदी वाड्या आकले गावात येतात. गावची लोकसंख्या बाराशेहून अधिक आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त ग्रामस्थ चिपळुणात येतात. ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील शेट्ये यांनी सांगितले, बिबट्या आम्हाला दिसतो. आजपर्यंत बिबट्याच्या जोडीने गावात अनेक ग्रामस्थांच्या गुरांचे नुकसान केले आहे. आकले गाव ग्रामस्थ संतोष सावंत यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. गावातील मांजरे, कुत्री, बकऱ्या फस्त केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:41 PM 2/MAY/2025














