अक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नका : भागुजी औटी

खेड : जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सतर्कता आवश्यक आहे. कुणीही क्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये. अशा लोकांवर पोलिसांची नजर राहणार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांनी सांगितले.

काश्मीर-पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येथील पोलिस ठाण्यात नुकतीच शांतता कमिटीची बैठक पार पडली.

यावेळी ते म्हणाले, काश्मीर येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे धार्मिक कलहाचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे दोन्ही समाजांतील घटकांनी सतर्कता बाळगून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही केले. शंका असल्यास थेट संपर्क साधा. तालुका शांततेसाठी प्रसिद्ध असून, हा लौकिक कायम ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिस यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनीच गांभीर्याने पालन करणे गरजेचे आहे.

काही शंका असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन नितीन भोयर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 01/May/2025