दापोली : दापोली बसस्थानक आणि एसटी आगारातील डेरेदार वृक्ष प्रवाशांना सावली देत आहेत. यांच्या सावलीतच अनेक प्रवासी आपली वाहने उभी करून पुढील प्रवासाकरिता एसटीने प्रवास करत असतात, तर अनेक पक्ष्यांचे ते माहेरघर आहे. या वृक्षांची कटाई करण्याचा घाट दापोली आगाराने घातला आहे.
हे वृक्ष कापू नयेत आणि आवारात किमान ५० वृक्षांची लागवड करावी. अगदी गरज भासल्यास केवळ फांद्या तोडाव्यात, अशा स्वरूपाचे पत्र पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे यांनी दापोली आगार व्यवस्थापक उबाळे यांना दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, तहसीलदार, रत्नागिरी एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच चिपळूण वनविभागालाही लेखी पत्र दिले आहे.
जीर्ण झालेल्या झाडांची कटाई थांबवावी. ज्या पद्धतीने आपण मनुष्य वयस्कर झाला, आजारी पडला तर त्याची देखभाल करतो, त्या पद्धतीनेच या वृक्षांची देखभाल करावी, असे पत्रात म्हटले आहे.
दापोलीचे तापमान हे ४० अंशाच्या आसपास पोहोचत असतानाच बसस्थानक आणि आगारातील सावली देणाऱ्या आणि हजारो पक्ष्यांच्या आसऱ्याच्या वृक्षांची कटाई करण्याचा घाट दापोली आगर व्यवस्थापनाने घातला आहे. याबाबत प्रवासी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 01/May/2025














