राजापूर : रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा आणि कमी वेळेत पोहोचवणारा अणुस्कुरा घाटमार्ग पावसाळ्यात धोकादायक बनतो. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर दरडी कोसळणे आणि भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत आहेत. याची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा हा घाटमार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
अरुंद रस्ता, धोकादायक वळणे आणि जागोजागी कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या दरडी यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरते. गेल्या दोन-तीन वर्षात अतिवृष्टीमुळे अनेक वेळा दरडी आणि माती कोसळून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला आहे. मागील वर्षी तर भूस्खलनामुळे सलग दोन आठवडे वाहतूक ठप्प झाली होती.
या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी नुकतीच नैसर्गिक आपत्ती आराखडा आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अणुस्कुरा घाटरस्त्यावरील धोक्याची परिस्थिती लक्षात घेतली. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन किंवा दरड कोसळल्यास तातडीने उपाययोजना करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि उपाययोजना सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यासोबतच, धोकादायक दरडी, अरुंद आणि धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलनाची ठिकाणे आणि संरक्षण कठड्यांची गरज यांसारख्या महत्वाच्या बाबींचे सखोल सर्वेक्षण करून अणुस्कुरा घाटमार्ग पूर्णपणे निर्धोक कसा करता येईल, यासाठी उपाययोजनांचा एक विस्तृत आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. या आराखड्यामुळे अणुस्कुरा घाटरस्ता अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 02/May/2025














