रत्नागिरी : जिल्ह्यासाठी खते, बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाचे नियोजन

रत्नागिरी : मान्सून सुरू होताच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. मात्र, तत्पूर्वीच शेतकऱ्यांना खते, बियाण्यांची उपलब्धता व्हावी, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ८० हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात येते. त्यामुळे कृषी विभागातर्फे खते व बियाण्यांची मागणी आधीच नोंदविण्यात आली आहे.

खरीप हंगामात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात तर १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवड करण्यात येते. उर्वरित क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक असल्याने कृषी विभागाने आधीच मागणी केली आहे. दि. २८ एप्रिल रोजी खताची पहिली रेक जिल्ह्यात येणार असून बियाणे मे महिन्यात उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

८० हजार हेक्टरवर खरीप
जिल्ह्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची लागवड केली जाते. मुख्य पीक भात असून सर्वाधिक लागवड आहे.

बियाण्याचे नियोजन काय ?
खरीप हंगामासाठी सात हजार ५४२ क्विंटल भात बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी पाच हजार क्विंटल भात बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते. मात्र, दुबार पेरणी करावी लागली तर पुरेसे बियाणे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीची मागणी केली आहे.

भाव वाढण्याची शक्यता
गतवर्षी खतांच्या दरात वाढ झाली होती. यावर्षीही दरवाढीची शक्यता आहे. मिश्रखतांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिश्र खताचाच सर्वाधिक वापर केला जातो.

खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे व खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावीत, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एप्रिलच्या अखेरीस खताची पहिली रेक येणार असून बियाणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील. मान्सूनपूर्वी शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध होणार आहेत-ए. डी. खरात, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 02/May/2025