रत्नागिरी : सेंट्रल टीबी डिव्हीजन, यांच्या मार्गदर्शक सुचनानूसार महाराष्ट्रात २२५० ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतपैकी ४२ ग्रामपंचायती टी.बी. मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरविण्यात आल्या.
तरी केंद्रीय स्तरावरुन प्राप्त पत्रातील मार्गदर्शक सुचनानुसार नमूद ग्रामपंचायतींना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महात्मा गांधींच्या पुतळा स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.यासोबत आरोग्याचे विविध कार्यक्रम व योजनांच्या माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. याप्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी क्षयरोगा बद्दल सखोल माहिती देऊन गौरावपात्र ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सेंट्रल टीबी डिव्हीजन, भारत सरकारने सन २०२५ अखेर देशातून क्षयरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाशी निगडित समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दुरीकरणासाठी पंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करणे हे टी.बी मुक्त पंचायत उपक्रमाचे ध्येय आहे.सदर कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट, व्यवस्थापक फिनोलेक्स कंपनी श्रीदत्त अलगुर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे व जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरीचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्षयरोग केंद्राचे सांख्यिकी अन्वेषक तेजस पारपोलकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 10-10-2024