खेडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे ‘टार्गेट’ पूर्ण

खेड : शहरात भटक्या कुत्र्ऱ्यांच्या उच्छादाने नागरिक मेटाकुटीस आले होते. मोक्याच्या ठिकाणी येणाऱ्या झुंडीच्या झुंडींमुळे नागरिक विशेषतः पालक धास्तावले होते. नगरप्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर २० मार्चपासून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर प्रशासनाने निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली. ४२ दिवसात ठेका घेतलेल्या पुणे येथील पेटस् फोर्स संस्थेने ५०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. नगरप्रशासनाचे ‘टार्गेट’ पूर्ण झाले असून आता पावसाळ्यानंतर निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्याबाबत नगरप्रशासन विचाराधीन असल्याचे समजते.

शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः थैमान घातले होते. भर रस्त्यातच बस्तान ठोकणाऱ्या कुत्र्यांमुळे पालकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. ये-जा करताना वाहनचालकांनाही वाहतुकीस अडसर निर्माण झाला होता. विशेषतः मंदिराच्या ठिकाणी ठाण मांडणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे भाविकांना दूरवरुनच दर्शन घ्यावे लागत होते.

अखेर नगरप्रशासनाला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मार्च महिन्यात मुहूर्त मिळाला. २० मार्चपासून प्रत्यक्षात नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पेटस् फोर्स कंपनीने सातत्य ठेवल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची रोडावली. शहरापासून काही अंतरावर असलेल्या भरणे, भोस्ते व रेल्वेस्थानक येथून शहरात भटक्या कुत्र्यांचा शिरकाव होण्याच्या शक्यतेने नगरप्रशासनाने तीनही ठिकाणी कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवली. येथून पकडलेल्या कुत्र्यांचेही निर्बिजीकरण करण्यात आले.

सद्यस्थितीत पकडण्याच्या भीतीने अनेक कुत्र्यांनी पलायन केल्याने नगरपरिषद हद्दीत मोजण्याइतपतच भटकी कुत्री निदर्शनास येत आहेत. या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्यात येणार आहे. नगरप्रशासनाने मोहीम राबवण्यापूर्वीच ५०० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ४२ दिवसात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास नगरप्रशासनाला यश आले. मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी मोहिमेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.

आणखी काही दिवस मोहीम राबवण्यात येणार आहे. यानंतर पावसाळ्यात रितसर निविदा काढून भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबवण्याबाबत नगरप्रशासन विचाराधीन आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्याधिकारी महादेव रोडगे घेणार असून पावसाळ्यानंतरच पुन्हा मोहीम राबवून कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत भटक्या कुत्र्यांची संख्या रोडावल्याने नागरिकांची धास्ती कमी झाली असून अपघातांचे प्रमाणही घटले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 03/May/2025