चिपळूण : वालोपे भोजवाडीत ‘जलजीवन’चे पाइप जळून खाक

अडरे : चिपळूण तालुक्यातील वालोपे भोजवाडी येथे जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे दहा लाखांचे पाइप आणून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी हे पाइप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ग्रामपंचायतीच्या फिर्यादीवरून पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

चिपळूण तालुक्यातील वालोपे गावाला २४ तास पाणी मिळावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते, या प्रयत्नाला यश आल्यानंतर जलजीवन मिशनअंतर्गत पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी लागणारे पाइप आणून त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी साठा करण्यात आला होता. वालोपे भोजवाडी येथे सुमारे दहा लाखाचे पाइप आणून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी २:३० वाजता या पाइपला अचानक आग लागली. ही आग वणव्यामुळे लागल्याचे सांगितले जात आहे.

आगीची घटना नागरिकांना समजल्यानंतर सरपंच प्रतीक सुर्वे, उपसरपंच समिधा कदम, सदस्य सुनील मोहिते, प्रवीण आग्रे, पूजा पिंपुटकर, ग्रामसेवक विश्वास पवार, नीलेश गुरव व ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्याचबरोबर नगर परिषद आणि लोटे एमआयडीसीतील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाची यंत्रणा पोहचेपर्यंत सर्व पाइप जळून खाक झाले होते.

ही आग नेमकी कशामुळे लागली, तेथे कोण उपस्थित होते का, यासह अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 03/May/2025