चिपळूण : “जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बदलतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रकाशराव देशपांडे यांनी केले. ते चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हिंदवी स्वराज्याच्या लष्करी तळाचे महत्त्व आणि ऐतिहासिक घडामोडी त्यांनी यावेळी उलगडून दाखवल्या. दळवटणे या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावित्र्य लाभले आहे. या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व विशद करताना श्री. देशपांडे म्हणाले, “आर्यावर्त, बलुचिस्तान, कराची, लाहोर हे आपलेच प्रांत होते. आजची स्थिती आपण जाणतो. त्यामुळे प्रत्येक गावाने आपला इतिहास जपायला हवा.” स्वराज्याचे सैन्य जिथे एकत्र आले, ते दळवटणे म्हणजे ‘दलाला दिलेले वतन’. या मध्यवर्ती सैन्य तळावरूनच जलदुर्गांच्या निर्मितीसाठी महसूल पाठवला गेला. राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची राजधानी रायगडकडे याच मार्गाने गेले. महत्त्वाचे म्हणजे, स्वराज्याचे नवे सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांना महाराजांनी याच ठिकाणी मानाचे महावस्त्र प्रदान केले, असे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तथा बापूसाहेब काणे व अॅक्टिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन दळवटणे येथे करण्यात आले होते.
दळवटणेचे सामरिक महत्त्व
दळवटणे येथे महाराजांनी सैन्य तळ का उभारला, या उद्देशावर प्रकाशराव देशपांडे यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, “या ठिकाणाच्या दोन्ही बाजूंना नदी आहे, म्हणजेच पाण्याची सोय होती. आजची खेर्डी औद्योगिक वसाहत म्हणजे पूर्वीची हत्ती माळ होती. तळकोकण, घाटमाथा आणि स्वराज्याची राजधानी यांना मध्यवर्ती ठेवून ही रचना केली गेली होती. दाभोळसारख्या सागरी मार्गावर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार जलद सैन्य हालचाल करणे इथून सोपे होते.”
अस्तित्वाच्या लढाया आणि शिवरायांची दूरदृष्टी
स्वराज्याची निर्मिती म्हणजे अस्तित्वासाठीचा संघर्ष होता. प्रत्येक लढाई निकराने लढावी लागली. शाहिस्तेखानाच्या महालात घुसून त्याची बोटे छाटणे, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे, पन्हाळ्याचा वेढा अशा अनेक प्रसंगात स्वराज्य संकटात सापडले होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टी, दृढनिश्चय आणि अतुलनीय पराक्रमाने प्रत्येक वेळी विजय मिळवला. ‘अजरामर मराठे हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ या भावनेतून त्यांनी हे रयतेचे राज्य उभे केले, असे देशपांडे म्हणाले. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, दिल्लीची बादशाही या सत्ता त्यांच्या पाशवी वृत्तीमुळे लयास गेल्या, पण शिवछत्रपतींच्या संस्कार आणि संस्कृतीमुळे मराठे त्यांच्या पश्चातही अजरामर राहिले.
प्रतापराव गुजर यांच्या लढाईतील मृत्यूनंतर, राज्याभिषेकापूर्वी अष्टप्रधान मंडळ पूर्ण करण्यासाठी सरसेनापतीची नियुक्ती महत्त्वाची होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना दळवटणे येथे मानाचे महावस्त्र दिले. याच सरसेनापतींनी राज्याभिषेक સમયે दोन किल्ले जिंकून महाराजांना नजराणा पेश केला, असे गौरवोद्गार देशपांडे यांनी काढले.
या कार्यक्रमावेळी दळवटणेच्या सरपंच वैदेही जाधव, माजी सरपंच सचिन शेट्ये, मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, संजय जाधव, दिलीप चव्हाण, मोरवणे देवस्थानचे अनिल शिंदे, प्रगतशील शेतकरी दिनेश दळवी, अॅक्टिव्ह ग्रुपचे कैसर देसाई, समीर कोवळे, कोमसाचे अध्यक्ष अरुण इंगवले, विलास महाडिक, लोटीस्मा कार्याध्यक्ष धनंजय चितळे, सुनील कुलकर्णी, सुनील खेडेकर, विनायक ओक, दादा खातू, अरुण पवार, स्कूल कमिटीचे शिवाजी साळुंखे, लेखक धीरज वाटेकर यांच्यासह ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 03-05-2025














