रत्नागिरी : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन या संघटनेद्वारे पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन रत्नागिरीमध्येही झाले. बँक मित्रांना कोणत्याही सेवाशर्ती लागू नाहीत त्या निर्धारित सेवाशर्ती लागू कराव्यात, बँक मित्र वापरत असलेल्या जागांचे भाडे त्याचप्रमाणे स्टेशनरी व वाहन खर्च याची भरपाई देण्यात यावी, बँक मित्रांना ते कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात त्याचे विमा संरक्षण मिळावे, त्याचप्रमाणे बँक मित्रांना सामाजिक सुरक्षितता लागू करून प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी व पेन्शन या अंतर्गत सुरक्षितता मिळावी या व इतर अनेक मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते.
वित्तीय समावेशकता या नावाने सुरू करण्यात आलेली झिरो बॅलन्स असलेल्या बँक खात्यांची योजना कालांतराने जनधन योजना म्हणून राबवण्यात येऊ लागली. माननीय पंतप्रधान यांनी या योजने अंतर्गत करोडो खाती उघडण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले व ही प्राथमिकता देखील बनवली. तुटपुंज्या कर्मचारी संख्येवर हे लक्ष पूर्ण होणे अवघड असल्याकारणाने बँकांनी त्याकाळी बैंकिंग करस्पॉन्डंट म्हणजेच बँक मित्र यांची भरती चालू केली व त्यांच्या माध्यमातून ही कोट्यवधी जनधन खाती उघडण्यात आली. जनधन खात्यांचे काम झाल्यानंतर या बँक मित्रांना बैंकिंग उद्योगातील नित्यनेमाचे बचत खात्यातील कॅश भरणा करणे व काढून घेणे ही कामे देखील देण्यात येऊ लागली त्याचबरोबर नवीन बचत खाते उघडण्याची कामही हे बँक मित्र करू लागले.
पूर्वी बँक त्यांना थेट कमिशनच्या स्वरूपात मासिक आमदानी देत होते.
कालांतराने जनधन खात्याची व्याप्ती देखील वाढली आणि कामाचे स्वरूपही खूप वाढले त्यामुळे बँकेने यातून काढता पाय घेऊन मध्यस्थी नेमले व त्यांच्या कर्वे या बँक मित्रांचे नियमन होऊ लागले. स्वाभाविकपणे हे मध्यस्थ म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीज यांनी कमिशनचे दर अवास्तवपणे कमी केले. आज हे बैंक मित्र स्वतः भाड्याने जागा घेऊन स्वतःचा संगणक वापरून त्यावर बँकांचे काम करतात व त्या बदल्यात त्यांना अत्यल्प दराने कमिशन मिळत आहे.
आपल्या अडचणी वारंवार सांगून देखील ना त्या बँका ज्यांच्यासाठी हे काम करतात, ना सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्या मागण्यांकडे लक्ष देत आहेत. अशावेळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमधून कार्यरत असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने पुढाकार घेऊन महाराष्ट्र राज्य पातळीवर महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन ही यांची संघटना स्थापन केली व कामगार दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. रत्नागिरीमध्ये देखील हे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया समोर झाले.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व रत्नागिरीमधील बैंक मित्राज असोसिएशन या संघटनेचे चेअरमन शैलेश मासये, निमंत्रक नीलेश कदम, सहनिमंत्रक प्रियांका गाबडे, रेश्मा शेलटकर व नितीन पांचाळ यांनी केले. यांना संपूर्ण सहाय्य व पाठिंबा बैंक कर्मचाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र स्टेट फेडरेशनचे नेते विनोद कदम व राजेंद्र गडवी यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 05/May/2025














