रत्नागिरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या भाग ३ मधील चाफेरी कासारी सांडे -लावगण रस्त्याच्या कामाला प्रारंभझाला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी जागा, मोरी बांधताना जलवाहिनी फुटण्याचा धोका आणि जुना गडगा बांधून देण्याच्या मुद्यांवर हे रस्त्याचे काम थांबले होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाचे कार्यकारी आणि उपविभागीय अभियंत्यांनी ग्रामस्थ आणि सरपंचांशी चर्चा करुन मार्ग काढल्यानंतर थांबलेले रस्त्याचे काम सुरु झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी -कासारी-सांडे लावगण रस्ता रुंदीकरणाच्या कामाला नोव्हेंबर २०२३ साली ठेकेदाराला कार्यारंभआदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला. ठेकेदाराने काम सुरु केल्यानंतर ग्रामस्थांच्या काही अडचणी निर्माण झाल्या. रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. रस्त्याची साईड पट्टी आणि गटारातून जलवाहिनी गेली आहे. याठिकाणी मोऱ्या आणि सिमेंटचे पाईप टाकताना जलवाहिनी फुटण्याची भिती होती. त्यामुळे या कामासाठीही अडचणी येत होत्या. पाण्याचा टँकर आणा आणि काम करा असे सांगितले जात होते. रुंदीकरणाच्या ज्याठिकाणी जुने गडगे जात होते तेथे नव्याने चिऱ्याचे गडगे बांधून देण्याची मागणी केली जात होती. या अडथळ्यांमुळे रस्त्याचे काम थांबले आणि ठेकेदाराने रुंदीकरणाच्या कामासाठी आणलेली सर्व यंत्रसामग्री हलवली. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम अडचणीत आले होते.
शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे उपविभागीय अभियंता अंबाजी माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. तातडीने हे काम सुरु न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर सुळ, उपअभियंता अंबाजी माने यांनी संयुक्त ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ आणि सरपंचांशी चर्चा करुन सर्व अडचणीच्या मुद्यावर मार्ग काढला. सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचा ६.३७० किमी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 05/May/2025














