बावनदीवर धरण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बाव नदीवर धरण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दि.३ मे रोजी झाले.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, देवरूख शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळाले पाहिजे, असे नियोजन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग होऊ नये म्हणून ५० हजार मुलींना मोफत लस देण्याचा निर्णय घेतलाय. असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा देशातील पहिला जिल्हा आहे.

देवरूख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा करतानाच, संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय. छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, तहसीलदार अमृता साबळे, मुख्याधिकारी श्री. विसपुते, राहुल पंडित, जि.प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती बाबू म्हाप, देवरूख नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष मृणालताई शेट्ये, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, दोन्ही गावचे सरपंच, सचिन मांगले, हनिफ हरचिरकर, नगरसेवक प्रफुल भुवड, वैभव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 05-05-2025