दापोली : लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज आढळल्याने खळबळ

दापोली : तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आल्या आहेत. हा बार्ज ऑईल रिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लाडघर आणि हर्णे समुद्राच्या मधोमध हा बार्ज तरंगताना दिसत आहे. समुद्रातील तेल साठ्याची पाहणी करण्यासाठी हे बार्ज आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, देशातील सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. दरम्यान, हा बार्ज आता दाभोळच्या दिशेने सरकत असल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांचा बळी गेला होता. या घटनेनंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि भारत सरकारने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्याने, या मार्गाचा वापर करूनही शत्रू हल्ला करू शकतो, हे लक्षात घेऊन किनारी भागातील सुरक्षा यंत्रणांना विशेष सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भात मच्छीमारांनाही समुद्राच्या काही विशिष्ट भागांमध्ये न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी निश्चित केलेली सीमारेषा ओलांडल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक मच्छीमारांची तातडीची बैठक बोलावून त्यांना सुरक्षेसंबंधी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

समुद्रात आढळलेला हा रहस्यमय बार्ज नेमका काय आहे आणि तो या ठिकाणी कसा आला, याबाबत सुरक्षा यंत्रणा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 10/May/2025