शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी आगाराला ९० लाखांचे उत्पन्न

रत्नागिरी : उन्हाळ्याच्या सुट्ट्यात रत्नागिरी शहर, ग्रामीण भागातील जि. प., नगरपरिषद, नगर पंचायतच्या शाळा, महाविद्यालयांनी रत्नागिरीसह कोकणातील इतर भागांत शैक्षणिक सहल झाल्या होत्या. एप्रिल २०२४ते मे २०२५ या शैक्षणिक सहलीसाठी रत्नागिरी आगाराच्या एकूण ४३७ एस. टी. बसेस बुकिंग करण्यात आल्या होत्या. यामध्ये रत्नागिरी आगाराला सरासरी ९० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या एस. टी. गाड्यांनी तब्बल २ लाख १० हजार ४१० किलोमीटरचा प्रवास केला आहे.

वर्षभर तासिका, अभ्यास, सराव यासह विविध उपक्रमांत शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व्यस्त असतात. त्यामुळे वर्षातून एकदा विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी, पूर्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते. त्यासाठी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील एकूण ९ डेपोत एस. टी. बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. यामध्ये रत्नागिरी ग्रामीण भागातील जि. प. शाळा, खासगी शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन ही सहल काढण्यात आली. यामध्ये सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी महिन्यात एस.टी. बसेसचे सर्वाधिक बुकिंग करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी वगळता मार्च, एप्रिल, मे महिन्यात एस. टी. बुकिंगची संख्या कमी झाली आहे. एकंदरीत, विशेष बस सेवा अंतर्गत शैक्षणिक सहलीतून रत्नागिरी आगारास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.

एस. टी. बसेस आरक्षण, उत्पन्न
एप्रिल २०२४-३० एसटी बसेसची बुकिंग करण्यात आले. त्यातून ३ लाख ९९ हजार ३०० रुपयांचे, मे३५ बसेसमधून ३ लाख ५ हजार ५२५ रुपये, जून-१० बसेस आरक्षण त्यातून ३ लाख ४७ हजार ८७५ रुपये उत्पन्न, सप्टेंबर १७ मध्ये १७ बस-७ लाख ४२ हजार ५०० रुपये, ऑक्टोबर – ३९ बसेसचे आरक्षण त्यातून ११ लाख ८३ हजार ६००, नोव्हेंबर ३१ बसेस बुकिंग त्यातून ६ लाख ३५ हजार ८००, डिसेंबर-७९ बसेसचे आरक्षण, तर त्यातून १६ लाख ५० हजार ९६३, जानेवारी २०२५ मध्ये ६९ बसेच्या बुकिंग त्यातून ९ लाख ८२ हजार ४५३ उत्पन्न, फेब्रुवारी ५४ गाड्या आरक्षण-९ लाख ८२ हजार ४५३ उत्पन्न, मार्च, एप्रिल, मे महिन्याअखेर तब्बल ४३७ एसटी बसेसची बुकिंग झाली, तर एसटी बसेसच्या आरक्षणातून रत्नागिरी आगारास तब्बल ९० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

शैक्षणिक सहलीसाठी निवडली ही ठिकाणे
शैक्षणिक सहलीत शाळा, महाविद्यालयांनी गणपतीपुळे, आरे वारे बीच, वॉटरपार्क, थीबा पॉईंट, प्राचीन कोकण, मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, रत्नागिरी किल्ला, यासह ऐतिहासिक स्मारकांना भेटी देण्यात आल्या.

विशेष बस सेवा अंतर्गत शैक्षणिक सहलीसाठी शहर, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल ४३७ एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यातून ९० लाखांचे उत्पन्न रत्नागिरी एस. टी. आगाराला मिळाले आहे. –बालाजी आडसुळे, रत्नागिरी आगर प्रमुख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 PM 17/May/2025