मंडणगडमधील १५० बांधकाम कामगार मंडळाच्या लाभांपासून वंचित

मंडणगड : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मंडणगड बांधकाम कामगार सुविधा केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातून नोंदणी केलेले १५० बांधकाम कामगार मंडळाच्या विविध लाभाच्या योजनांपासून वंचित आहेत.

या संदर्भात कार्यालयाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकांऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड केंद्रावर नावाखाली अन्य जिल्ह्यांतून करण्यात आलेल्या बोगस नोंदणीमुळे मंडणगड येथील कार्यालयाकडून नोंद करण्यात आलेले प्रस्ताव अद्याप प्रक्रियेत ठेवण्यात आले आहेत. मंडणगड तालुक्याच्या नावाने कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणी संदर्भात चौकशी सुरु आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती दिली.

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात या मंडळाचे कार्यालय तालुका पातळीवर मंडणगड येथे सुरु झाल्याने कामगारांची मोठी सोय झाली. तालुक्यातील बांधकाम कामगारांनी कार्यालयाच्या माध्यमातून मंडळाकडे नोंदणी केली. मे महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कार्यक्रम घेऊन नोंदीत कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र मंडणगड तालुक्यात अद्याप असा कोणताही कार्यक्रम झालेला नाही. मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना शासनाच्या माध्यमातून आरोग्य विमा, नैसर्गिक व अपघाती मृत्यू विमा, शिक्षण कर्ज, विवाहासाठी मदत, घरासाठी अनुदान अशा अनेक योजना आहेत.

तालुक्यातील अनेकांनी नोंदणी करुनही मंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे अथवा नाही याची माहीतीही त्यांना मिळालेली नाही. सगळ्यांची नोंदणी प्रक्रियेतच अडकलेली आहे. ही बाब लक्षात घेता बांधकाम कामगारांना मंडळांच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वरिष्ठ यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 10/May/2025