रत्नागिरी : २७ किनाऱ्यांवरून ५४ हजार कासव पिल्ले झेपावली समुद्राकडे..

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वनविभागाच्या पुढाकारामुळे आणि कासवप्रेमी, तसेच स्थानिक लोकांचा कासवांच्या संवर्धनात सहभाग वाढल्याने जिल्ह्यात कासवांच्या अंड्यांचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून, बाहेर पडणारी पिले लक्षणीय संख्येने समुद्राकडे झेपावत आहेत. गेल्यावर्षी ८८,३१२ अंड्यांतून बाहेर पडून ४८,७४० पिले समुद्राकडे परतली. तर यंदा तब्बल २७ किनाऱ्यांवरील १,३५२ घरट्यांतील १,३४,३७३ अंड्यांतून बाहेर पडलेली ५४,०७८ पिले समुद्राकडे झेपावली आहेत.

गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कासवांच्या घरट्यांची आणि त्यातील अंड्यांची संख्या लक्षणीय वाढत असून त्याबद्दल साऱ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. यावर्षी ५४,०७८ कासवांच्या पिलांना समुद्रात सोडण्यात आले आहे. यंदा किनाऱ्यांची संख्या आणि घरट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे – किरण ठाकूर, परिक्षेत्र वन अधिकारी, कांदळवन कक्ष, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेला वर्ष २००२ मध्ये कासवांची घरटी आढळली. या संस्थेने वेळास (ता. दापोली) मध्ये कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी १२ किनाऱ्यांवर, दुसऱ्या वर्षी १३ आणि गेल्यावर्षी १६ आणि यंदा ३४ किनाऱ्यांवर अंड्यांचे संवर्धन केले गेले. २०२३-२४ या वर्षापर्यंत वनविभागाच्या माध्यमातून कासवप्रेमी यांचा पुढाकार आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग यातून संवर्धनाचे कार्य होत होते. गेल्या वर्षापासून (२०२४-२५) येथील कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कासवांचे संवर्धन आणि संरक्षण होत आहे.

२०२३-२४ या वर्षात दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांमधील १६ किनाऱ्यांवर कासवांची ८९६ घरटी संरक्षित करण्यात आली. यात जतन केलेल्या ८८,३१२ अंड्यांमधून बाहेर पडलेल्या ४८,७४० पिलांना समुद्रात सोडण्यात आले. तर २०२४-२५ या वर्षात घरट्यांची संख्या वाढली असून या तीन तालुक्यांबरोबरच गुहागर आणि राजापूर अशा पाच तालुक्यांमध्ये १३५२ घरट्यांमध्ये जतन केलेल्या १,३४,३७३ अंड्यांमधून बाहेर पडलेली ५४,०७८ पिले समुद्राकडे झेपावली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 10/May/2025