पहलगाममधील दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला दिलेलं प्रत्युत्तर तसेच पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत होत असलेले हल्ले यामुळे देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे पुरेसे साठे आहेत का, याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करून देशात अन्नधानाच्याचा पुरेसा साठा असून, अन्नधान्याबाबत चिंता न करण्याचे आवाहन केले आहे.
देशातील सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. तसेच आमच्याकडे धान, गहू, डाळी, फळे आणि भाजीपाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. देशभरातील शेतकऱ्यांकडून पिकांची आणि धान्याची खरेदी सुरळीतपणे सुरू आहे, तसेच अन्नधान्यापासून बागायतीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादन हे अंदाजापेक्षा अधिक आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्रालयाने शनिवारी देशभरातील नागरिकांना उद्देशून हे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रत्येक शेतापर्यंत आवश्यक माहिती, साधनसामुग्री पाठवण्याच्या दिशेने सतत कार्य केले जात आहे, तसेच समन्वय राखला जात आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ आणि प्रशासन तिघेही एकजूट आहेत. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमची तयारी पूर्ण झालेली आहे, असेही शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
तत्पूरवी केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही देशामध्ये जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही टंचाई नसून, अशा वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की, आमच्याकडे सद्यस्थितीमध्ये सामान्य आवश्यकतेपेक्षा अधिक स्टॉक उपलब्ध आहे. तांदूळ, गहू, चणे, तूर, मसूर, मुग यासारख्या डाळीही पुरेशा प्रमाणात आहेत. कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. त्यामुळे घाबरू नका, तसेच अन्नधान्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 10-05-2025
