खेड : कोकणातील निसर्गसंपन्न आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील ठरवण्यात आलेल्या गावांमध्ये अवैध वाळू उपशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खेड तालुक्यातील महाळुंगे गावाजवळील नदीपात्रात जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने सर्रास वाळू उपसा होत असून, महसूल विभाग आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
राज्य व केंद्र सरकार कोकणातील काही गावांना पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील घोषित करण्याच्या प्रक्रियेत असतानाच, दुसरीकडे नद्यांच्या पात्रांमध्ये अवजड यंत्रसामग्रीने राजरोस पणे वाळू उपसा करुन हस्तक्षेप केला जात आहे. महाळुंगे येथील नदीपात्रात जेसीबी आणि डंपरच्या माध्यमातून खुलेआम वाळू उपसा सुरू असून, हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या महसूल विभागाच्या नाखाली घडत आहेत.
विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप नियंत्रित वाळू उपसा धोरण लागू करण्यात आलेले नाही. स्वामित्वधन भरून वाळू उपसा करण्यास कोणालाही परवानगी दिलेली नसतानाही, महसूल राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या मतदारसंघात हा प्रकार सुरू असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
या प्रकाराची माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप व तहसीलदार सुधीर सोनवणे यांना देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या गैरव्यवहारावर कारवाई नेमकी कोण करणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 12/May/2025
