खेड : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षातील तब्बल 9 प्रवासी जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील एसएल फाटा लोटे येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली. त्यातील नऊ प्रवासी जखमी झाले. ही घटना ९ मे रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष दशरथ शिंदे (वय ५७, रा. सोनगाव, बागवाडी, ता. खेड) हे त्यांच्या मालकीची रिक्षा (क्रमांक एम.एच.०८ ए.क्यू ८८९७) मध्ये प्रवाशांना घेऊन पटवर्धन लोटे ते पीरलोटे असा प्रवास करत होते. त्याचवेळी चिपळूण बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.०८ ए एक्स ६२४५) चा चालक अक्षय धोंडीराम जाधव (सध्या रा. आवाशी समर्थनगर, ता. खेड, मूळ रा. शाहूवाडी, कोल्हापूर) याने निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवत खेडकडून चिपळूणकडे जाणारा हायवे क्रॉस करून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडवर वळवला. याचवेळी त्याच्या ट्रॅक्टरची रिक्षाला जोरदार धडक बसली.

धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा पलटी झाली आणि त्यामधील प्रवासी संतोष दशरथ शिंदे, अंजली अनंत सावंत, सुरेखा सुरेश सावंत, शैलेश सदानंद तांबे, ब्रिज किशोर चौरासिया, राहुल गुलाबचंद पाटील, संतोष हिराजी तांबे, विजय कुमार शेखर जैस्याल आणि बिंदकुमार जितेंद्र सिंह हे नऊ जण जखमी झाले. त्यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी संतोष शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अक्षय जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 12/May/2025