रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे चिपळूण येथे उद्घाटन

रत्नागिरी : कोकणाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणमधील १६० वर्षांची संस्था लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन दि. ११ मे रोजीरत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

हे वस्तुसंग्रहालय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा ठेवा असल्याची भावना श्री. सामंत यांनी या वेळी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या वस्तुसंग्रहालयाच्या फेरउभारणीसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, चिपळूणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

चार वर्षांपूर्वीच्या भयावह महापुरात झालेल्या अपरिमित नुकसानानंतर हे वस्तुसंग्रहालय शासनाच्या सहकार्याने वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर अत्यंत परिश्रमपूर्वक नव्याने उभे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, आमदार शेखर निकम, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे अभ्यासक प्रकाश देशपांडे, माजी आमदार रमेश कदम, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, संध्या साठे-जोशी, पुराणवस्तू संग्राहक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

उद्घाटनानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमात श्री. सामंत म्हणाले, २०२१मध्ये या शहरात आलेला महापूर मी स्वतः पाहिला आहे. या महापुरामध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाचे पूर्णतः नुकसान झाले. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी शहरासाठी दिलेल्या साडेचार कोटी रुपयांच्या निधीतील ५० लाख रुपयांचा निधी या वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीसाठी द्यावा, अशी सूचना केली होती. हाच खरा जिल्ह्याचा संस्कार आहे. त्यांच्यामुळेच आज लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे हे वस्तुसंग्रहालय नव्याने उभे राहिले आहे. हे वस्तुसंग्रहालय नव्याने उभे राहिले आहे. हे वस्तुसंग्रहालय ३६ वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये उभारण्यात माजी आमदार रमेश कदम यांचे योगदान सर्वांत मोठे आहे. चिपळूण पालिकेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या शहराला साजेशी पालिकेची भव्य इमारत उभी करण्याचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जेवढे पैसे या इमारतीसाठी लागतील, तितका निधी पोहोच करण्याची जबाबदारी मी नक्की पार पाडेन.

चार वर्षांपूर्वीच्या भयावह महापुरात झालेल्या अपरिमित नुकसानीतून अत्यंत परिश्रमपूर्वक सावरलेले वस्तुसंग्रहालय शासनाच्या सहकार्याने वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर नव्याने उभे राहिले आहे. या ठिकाणी मागील पाचशे वर्षांपासूनच्या अप्रतिम शिल्पकलेच्या व अलौकिक धातुशास्त्राच्या मूर्ती आणि ऐतिहासिक व अत्यंत दुर्मिळ शस्त्रांपासून अश्मयुगीन हत्यारांपर्यंतचा खजिना स्थानापन्न झाला आहे. हरणाच्या शिंगाचे ‘माडू’ हत्यार, शत्रूच्या शरीरात आणि विशेषतः पोटात मारून त्याची आतडी ओढणारे ‘गुर्ज’ हत्यार आदी विविध काळातील शस्त्रे, कोकणातील नारळाच्या झापांचे घर, शिमगा-संकासूर, ग्रामदेवतांची पालखी आदी ऐवज येथे पाहता येणार आहेत. चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय केवळ पुस्तकांच्या देवाणघेवाणीपुरते मर्यादित न राहता मुक्त वाचनालय, कलादालन, ऐतिहासिक दस्तऐवजांचे लोकजागरण यांसह स्वातंत्र्यसमरातील क्रांतिकारक व त्यांचे कार्य, स्पर्धा परीक्षार्थीसाठी अरविंद जाधव अपरान्त संशोधन संस्थेसह कार्यरत आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे हे संग्रहालय २०२१मध्ये चिपळूणला आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झाले होते. पुरामुळे निर्माण झालेल्या चिखलातून संचालक मंडळाने एकेक वस्तू गोळा करून ठेवली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्ध्वस्त झालेल्या संग्रहालयाला भेट देऊन संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 12-05-2025