काजू उत्पादनावर कोकण क्रांती करू शकतो : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : ब्राझीलप्रमाणे कोकणदेखील काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत,” असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेमध्ये प्रयोगशील आणि विविध स्पर्धेतील विजयी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, “रत्नागिरीचा हापूस आंतरराष्ट्रीय दर्जावर विक्री करतोय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगातील विविध लागवडीकडे वळले पाहिजे. भात, नाचणी, फळबगांचे लागवड क्षेत्र वाढले पाहिजे. त्यासाठी आत्मपरिक्षण केले पाहिजे. नोकरीपेक्षा १० पट पैसे हे शेतीमधून मिळवू शकतो. त्यासाठी शेती वाढविली पाहिजे. शेती उत्पन्नाला कर नाही. शासनाने विविध योजना दिल्या आहेत. या योजनांचा फायदा घेवून शेती करायला हवी. निसर्ग सुधारायचा असेल आणि प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा असेल तर बांबू लागवडीला पर्याय नाही. पुढचे कृषी प्रदर्शन हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे असेल.”

फलोत्पादन मंत्री श्री गोगावले म्हणाले, “फळबागा लागवडीसाठी १०० टक्के फलोत्पादन पूर्वीची शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना सुरू करणारा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाईल. दर्जेदार बियाणे, खते शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. फळबाग वाढीसाठीचे यंदाचे १९०० हेक्टर उद्दिष्ट पूर्ण करावे. म्हणजे मुंबईत होणारे स्थलांतर थांबेल. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तयार करावे. काय केल्यावर काय होतेय, याची माहिती द्यावी. बांबूला ७ लाख सबसिडी दिली जाते. शिवाय तो टनावर विक्री होतो. त्यापासून प्रक्रिया उद्योगातून मोठा रोजगार आणि उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं करतोय. शासनाच्या योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय वाढवावा.”

महसूल राज्यमंत्री श्री कदम म्हणाले, शेती हा व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. तो विकसित होत आहे. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चांगला उद्देश साध्य करतोय. याचा उपयोग शेती हा मोठा व्यवसाय करण्यासाठी करावा.

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करावी. अॅग्रीस्टॅकदेखील पूर्ण करावे. शेतीपूरक वौयवसाय वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे पूर्ण करावीत. पाणी अडवण्याची मोहीमही राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यावेळी स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 13/May/2025