महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग.. अजित पवार कोणती मोठी घोषणा करणार?; पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच अजित पवार मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतून १० मिनिटांत बाहेर पडले अशा बातम्या माध्यमांत झळकल्या. त्यावरून विरोधकांनी विविध दावे केलेत. आता संध्याकाळी अजित पवार महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार काय भूमिका मांडतायेत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी ६.३० वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉन्जमध्ये ही पत्रकार परिषद होईल. त्यामुळे या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार काय बोलणार याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत सातत्याने विविध बातम्या समोर येतायेत. त्यात महायुतीत अजित पवारांची कोंडी होत असल्याचा दावाही विरोधक करत आहेत.

महायुतीकडून अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यात भाजपा सर्वाधिक १५०-१६० जागा लढवण्यावर ठाम आहे तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनेही ८०-९० जागांवर दावा केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे निश्चित नाही. आम्हाला ६०-६५ जागा मिळाव्यात अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. परंतु अद्याप महायुतीचं जागावाटप निश्चित नाही. त्यातच शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळांनी त्यांना शुभेच्छा देताना नांदगाव मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिलेत. मात्र याठिकाणी शिंदे गटाचे सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत काही आलबेल नाही असेच चित्र दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 11-10-2024