रत्नागिरी : मिऱ्या येथील आंदोलनामध्ये कोणतीही समिती स्थापन झाली नाही किंवा कोणत्याही पुढाऱ्याला पुढारीपण दिलेले नाही. असे असताना उद्योगमंत्री कोणता नेता, पुढाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहेत? त्यामुळे मिऱ्या एमआयडीसी रद्द करण्याबाबत जी काही चर्चा करायची आहे, ती मिऱ्या गावामध्ये येऊनच उद्योगमंत्री उदय सामंत यांना करावी लागेल, कोणीही ग्रामस्थ चर्चेसाठी शहरात येऊन वैयक्तिक चर्चा करणार नाही. प्रस्तावित एमआयडीसी रद्दच झाली पाहिजे, अशी परखड भूमिका काल मिऱ्या ग्रामस्थांनी घेतली. प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या.
आम्ही कोणत्याही पुढाऱ्याला किंवा नेत्याला गावाच्यावतीने चर्चा करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही ते करू, असे ग्रामस्थांनी सांगितले. मिऱ्या एमआयडीसी रद्द व्हावी, याकरिता हरकती नोंदवण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. मिऱ्या ग्रामस्थ आज प्रांत कार्यालयामध्ये हरकती नोंदणीसाठी आले होते. उद्योग मंत्रालयाने एमआयडीसीच्या माध्यमातून मिऱ्या गावामध्ये लॉजिस्टिक पार्क खासगी जमिनी अधिग्रहण करून पोर्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता त्या अनुषंगाने ग्रामस्थांना जमीन अधिग्रहणाच्या नोटीस प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे मिऱ्या गावामध्ये नाराजी निर्माण झाली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
निसर्गाचे जतन करा
मिऱ्या हे एक बेट असून, या बेटाचे सौंदर्य सर्व जगाला भुरळ घालणारे आहे. या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग आणण्याच्या निर्णयाला गाववाल्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांच्या मते, या गावामध्ये पर्यटनाच्या आधारित उद्योग व्यवसाय व्हावेत, यासाठी शासनाने पुढाकार घेऊन येथील जैवविविधता जपून इथले सागरकिनारे, डोंगर, फळबागायती यांचे जतन करून येथील दालन पर्यटनासाठी उघडी करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वृत्तपत्रांमधून, बॅनर लावून, बैठका घेऊन रीतसर हरकती नोंदवून शासनाला कळवले आहे.
आजवर चर्चा नाहीच
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमधून मी मिऱ्या ग्रामस्थांना भेटून ग्रामस्थांसोबत चर्चा करेन आणि त्यांना जर का हा उद्योग नको असेल, तर ग्रामस्थांना अपेक्षित असेल ते निर्णय घेऊ, असे म्हटले होते त्याकरिता ते मिऱ्या ग्रामस्थांसोबत चर्चाखील करणार होते; परंतु आजपर्यंत अशा प्रकारची कोणतीही चर्चा घडून आलेली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 12/Oct/2024