रत्नागिरी : कोकण नगर प्रकरणी १४० जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काढलेल्या पथसंचलनात घुसून मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मध्यरात्री उमटली. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत हिंदू समाजाचे कार्यकर्ते मध्यरात्री दीड वाजता कोकणनगर येथील मुस्लीम मोहल्ल्यात घुसले. तर चर्मालय येथे दोघांना मारहाण करण्यात आली. मोहल्ल्यात घुसलेल्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने रोखले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली. या घटनेमुळे रत्नागिरी शहरात तणाव निर्माण झाला असून शहर पोलिसांनी मुस्लीम समाजाच्या मुसा काझी यांच्यासह 100 जणांविरूद्ध तर हिंदू समाजाच्या सागर कदम, यश सुर्वे, शिवम साळवी यांच्यासह सुमारे 30 ते 40 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या कोकणनगर येथे राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी : विजयादशमीच्या पूर्वसंधेला पथसंचलन

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कोकणनगर नजिकच्या कदमवाडी नं.1 मधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन सुरू होणार होते. तत्पूव काही मीटर आत असलेल्या गार्डनच्या आवारात संघाचे कार्यकर्ते एकत्र आले. तेथून ते मुख्य मार्गावर येणार होते. त्याचवेळी मुस्लीम समाजाचा जमाव पथसंचलनाजवळ आला. त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या. परंतु पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे पथसंचलन रत्नागिरी शहराच्या दिशेने रवाना झाले.
पथसंचलन संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पाटचे कार्यकर्ते शहर पोलीस स्थानकात एकत्र आले. माजी आमदार बाळासाहेब माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह संघ पदाधिकाऱ्यांनी संचलनात घुसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार देण्याची सूचना केली. वरूण सुंदरशाम पंडित यांनी शहर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून माजी नगरसेवक मुसा काझी यांच्यासह 100 जणांवर न्यायसंहिता 189 (1), 185(2), 191(1), 192, 195, 196, 57, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 57/137 नुसार गुन्हा दाखल केला.
मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संघाचे उपस्थित कार्यकर्ते आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनीही संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगितले. परंतु आक्रमक झालेल्या जमावाने पोलीस स्थानकातून थेट कोकणनगरकडे धाव घेतली. दरम्यान, चर्मालय येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमाव थेट मुस्लीम मोहल्ल्यात घुसला. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. उपस्थित पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकण्याच्या तयारीत नव्हता. यावेळी पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाने सौम्य लाठीचार्ज करीत जमावाला पांगवले. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
सायंकाळी 6 वाजल्या-पासून सकाळी 6 वाजेपर्यंत दोन्ही बाजुकडून ॲक्शन-रिॲक्शन येत राहिल्याने 12 तास तणाव कायम होता. पोलीस हवालदार उमेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर प्रकाश कदम, यश नितीन सुर्वे, शुभम संजय साळवी यांच्यासह सुमारे 30 ते 40 जणांविरूद्ध बेकायदा जमाव करून मुस्लीम मोहल्ल्यात घुसून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी न्यायसंहिता 189(2), 190, 191(2), 196, 118(1), 57 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मध्यरात्री घटनास्थळी पोलिसांनी चित्रिकरण केले होते. त्याआधारे उर्वरित आरोपींचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. गुन्ह्यातील काहींना नोटीसची बजावणी करण्यात आली आहे. तर कोकणनगर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्यासह राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.