चिपळूण : कोंढे बौद्धवाडी येथे मोरी खचली

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोंढे-बौद्धवाडीसमोर मोरी दोन्ही बाजूंनी खचली आहे. या ठिकाणी दोन मोठे खड्डे पडले आहेत. तर कोंढे-कळवंडे मार्गावरील रिगल कॉलेज परिसरात रस्त्यावरची लोखंडी जाळी वर आल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. शिवाय पादचाऱ्यांनाही त्याचा धोका निर्माण झाला असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

तालुक्यातील कोंढे-बौद्धवाडी येथून वाहणारा वाघपऱ्या काही अंतरावर असणाऱ्या मुख्य नदीला जाऊन मिळतो. याच परिसरातून गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने त्या ठिकाणी मोरी ठेवण्यात आली आहे. काही वर्षांपूवही ही मोरी खचण्याचा प्रकार घडला होता. तर येथे एका वाहनाचा अपघात होऊन या मोरीची पुरती दूरवस्था झाली होती. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या मोरीची दुरूस्ती केली होती. मात्र अलिकडच्या काही दिवसांत ही मोरी दोन्ही बाजूंनी पुन्हा खचल्याचा प्रकार समोर आला आहे. या परिसरात दोन मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्यांची रूंदी वाढून या मार्गावरची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

मुळातच गुहागर पर्यटन स्थळ असल्याने या मार्गावरून पर्यटकांसह एसटी बसेस, ट्रक व काही मोठ्या कंपन्यांमुळे मोठे ट्रक अशी शेकडो वाहने दररोज धावतात. त्यामुळे मोरी आणखी खचून तसेच खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता आहे.

सध्या पाऊस पडत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरीचे काम हाती घेऊन ते तातडीने माग लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याच भागापासून काही अंतरावर असणाऱ्या रिगल कॉलेज येथील कोंढे-कळंवडे रस्त्यावरही सध्या धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी पाणी वाहून जाण्यासाठी या मार्गावर गटार ठेवण्यात आले आहे. त्यावर लोखंडी जाळी बसवण्यात आली होती. सध्या हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अखत्यारित आहे. या परिसरातील लोखंडी जाळी वर आल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तुषार करंजकर यांनी केली आहे.

Tata motars tiago

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 06/Jun/2025