Ratnagiri : रनपार किनाऱ्यावरील ‘त्या’ बार्जचा मुक्काम वाढण्याची शक्यता

रत्नागिरी : पूर्णगड सागरी हद्दीमध्ये अरबी समुद्रात फिनोलेक्स जेटीसमोर 4 जून रोजी एक संशयास्पद बार्ज आढळली होती. पण ते बार्ज गोव्यातील वास्को द गामाहून नवी मुंबई बदलापूरकडे जात असताना तांत्रिक बिघाडामुळे येथे नांगरून ठेवण्यात आले होते. या बार्जची दुरुस्ती झाली असून पुढील परवानगी मिळाल्यानंतर ते रवाना होणार असल्याचे प्रादेशिक बंदर विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

वास्को द गामा येथून 3 जून 2025 रोजी ऑईल घेऊन नवी मुंबई बदलापूर येथे जाणेकरीता निघालेले ते बार्ज 4 जून रोजी सकाळी 11 वा.चे दरम्याने रत्नागिरी येथील फिनोलेक्स जेटी समोर अरबी समुद्रात आले होते. त्या बोटीमध्ये बॅटरी व पाण्याचा पंप यामध्ये बिघाड झाला. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ती बार्ज रनपार किनार्‍यालगत आणून नांगर टाकून उभी करण्यात आली होती. पण त्याची खातरजमा होईपर्यंत येथील सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती. कोस्ट गार्डचे अधिकारी यांनी त्या संशयित बार्जमधील लोकांशी संपर्क साधला होता. त्यावरील खलाशांनी कंपनीशी संपर्क साधून बोटीवरील बिघाड संदर्भात कळविण्यात आले.

नागरून ठेवलेल्या या बार्जची दुरूस्तीही तंत्रज्ञांच्या मदतीने झाल्याचे सांगितले जात आहे.? ? मात्र, त्यानंतर बार्जचा पुढील प्रवास रखडला आहे. फिनोलेक्स जेटीसमोरील समुद्रात नांगरून ठेवण्यात आलेले ते बार्ज आठवड्यानंतरही अजून त्या जागेवर उभे आहे. कारण पुढील प्रवासासाठी आवश्यक असलेल्या बंदर विभागाकडील परवानगीबाबत संबंधित जहाजाच्या कंपनीने पावले उचलणे गरजेचे आहे. ती परवानगी घेतल्यानंतर या बार्जच्या पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बंदर विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. ती परवानगी आणल्यानंतरही ओढून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या टगची उपलब्धता होणे गरजेचे आहे. पण खवळलेल्या समुद्रात टग येण्यासमोरही प्रश्न उभा राहणार आहे.

बसरा स्टारची विल्हेवाट पावसाळ्यानंतर
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी अडकून पडलेल्या बसरा स्टार जहाजाचे लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे झाले आहेत. पाच वर्षे एका जाग्यावर अडकून पडलेल्या जहाजाची सुमारे ३५ लाखांची कस्टम ड्यूटी भरली असल्याने ते भंगारात काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जहाजाचे तुकडे हटवण्यात येणार आहेत; परंतु पावसाळी वातावरणाचा याला अडसर येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 12/Jun/2025