दापोली : साने गुरुजी यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे दापोली तालुक्यासह पालगड गावाचे नाव इतिहासाच्या पानावर खर्या अर्थाने कोरले गेले आहे. परंतु गुरुजींचे स्मृती भवन आजही दुर्लक्षितच राहिले आहे. शासनाने याकडे लक्ष दिले नसल्याचे उघड झाले आहे. साने गुरुजींची 11 जून रोजी पुण्यतिथी निमित्त गावात त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
‘भारत रत्नां’चा तालुका म्हणून दापोलीची ओळख आहे. याच भारतरत्नांचा वारसा लाभलेल्या दापोली तालुक्यात पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 साली त्यांच्या पालगड या गावी आजोळी परचने यांच्या घरी झाला.गुरुजींचे गाव आणि आजोळ हे पालगडच आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पालगड गावातील मराठी शाळेत इयत्ता सातवीपर्यंत झाले. त्या नंतर दापोली शहरातील (आल्फ्रेड गॅड़ने) ए. जी हायस्कूल या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते औंधला गेले. त्यामुळे पालगड गावाला गुरुजींचा सहवास कमी लाभला. 1924 साली ते अमळनेर येथे नोकरीसाठी गेले. त्या काळात पालगड येथील गुरुजींचे राहते घर मोडकळीस आले होते. अमळनेर येथील प्राचार्य गोखले यांनी त्यांना घर बांधण्यासाठी त्या काळात पाचशे रुपये दिले. त्यावेळी पालगड येथील दानशूर व्यक्तिमत्त्व विठ्ठल बाबाजी बेलोसे यांनी सन 1925/26 या साली गुरुजींच्या घराचे बांधकाम केले. सागवानी लाकडात कलाकुसर केलेले बांधकाम शंभर वर्षे होऊनही मजबुतीची साक्ष आजही देत आहे. मात्र, या घरात गुरुजी राहिले नाहीत. गुरुजींना दोन भाऊ त्यातील दादा साने फक्त काही काळ या घरात राहिले. नंतर तेही ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला निघून गेले. त्या काळात त्यांचा मामेभाऊ या घरात राहत असे. अधून मधून गुरुजी पालगड गावी येत असत पण ते त्या घरी राहिले नाहीत. येथील केळकर यांच्या घरी त्यांनी अनेकदा मुक्काम केला. त्या काळात येथील केळकर हे गुरुजींना पंढरी या नावाने हाक मारत होते.
सन 1947 साली गुरुजी हे पालगड गावी शेवटचे आले त्या काळात त्यांनी पालगड गावात एक सभा देखील घेतली हाती, अशा पुसट आठवणी आजही येथील काही नागरिक सांगतात. त्यांनी नोकरी सोडून ते देशाच्या सत्याग्रहात उतरले त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. या काळात तुरुंगात श्यामची आई, वेगवेगळ्या भाषेत लिहिलेले गीता प्रवचन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर लिहिलेले डिस्कव्हरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) हे लिखाण अत्यंत प्रभावी ठरले. त्यांनी काही काळ मुंबई दादर येथे वास्तव्य केले. आज पालगड गावी त्यांचे स्मृतिभवन आहे. मात्र, शासनाने अनेकदा याकडे दुर्लक्ष केले आहे. काही सामाजिक संस्थांनी अनेकदा सानेगुरुजी स्मृती भवनची डागडुजी करून त्याला रूप आणले आहे. ज्या थोर पुरुषाने देशात देश स्वातंत्र्याची चळवळ उभी केली अशाची स्मारके देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली तरी दुर्लक्षितच राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 12-06-2025














