जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिनानिमित्त रत्नागिरीत जनजागृती फेरी

रत्नागिरी : जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी रत्नागिरीत जनजागृती फेरी काढण्यात आली. तिचे उद्‌घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले.

यावेळी सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम, जिल्हा परिवीक्षा अधिकारी आतिष शिंदे, परिवीक्षा अधिकारी अनिल माळी, जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य प्रिया लोवलेकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, चाइल्ड हेल्पलाइन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायदासाथी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथून फेरीला प्रारंभ झाला. कुलकर्णी कंपाऊंड येथून धनजी नाका, मारुती आळी, गोखले नाका ते सावरकर चौक येथे फेरीचा समारोप झाला. ‘बंद करा बंद करा बालमजुरी बंद करा, बालमजुरी सोडा शिक्षणाशी नाते जोडा’, यासारख्या घोषणा देत अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कायदासाथी यांनी बाजार परिसरात जागरूकता केली.

बालकामगारास आर्थिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कारणामुळे कोवळ्या वयातच अर्थार्जनाची कास धरावी लागते. या प्रश्नाकडे केवळ कायद्याखालील तरतुदी व त्याअंतर्गत असलेल्या उपाययोजनांपुरते मर्यादित दृष्टीने न पाहता बालमजुरी प्रश्नाच्या निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता व त्या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे. आपणास कोठेही बालमजूर आढळल्यास चाइल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटणकर यांनी केले. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम १९८६ अधिसूचना व सुधारित अधिसूचना २०१६ नुसार सर्वच व्यावसायिक व प्रक्रियांमध्ये १४ वर्षांखालील बालकास काम करावयास प्रतिबंध आहे.

Swami swaru. Pat.

१४ वर्षांखालील बालकास धोकादायक व बिगरधोकादायक उद्योगधंद्यांमध्ये कामावर ठेवल्याचे आढळल्यास २० हजार रुपये दंड तर एक वर्षाची जबर शिक्षा कायद्यात आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवल्यास दुकान मालकावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यानुसार सहा महिने व दोन वर्षांपर्यंत शिक्षा व 20 ते 50 हजार रुपये दंड किंवा दोन्ही स्वरूपाची शिक्षा अशी तरतूद आहे. जिल्ह्यातील कोणत्याच आस्थापनांमध्ये बालमजूर ठेवू नये, असे आवाहन श्री. पाटणकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 13-06-2025