मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या मोराला जीवनदान

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड आणि चिपळूणच्या दरम्यान लवेल येथील सुग्रण धाब्यापासून काही अंतरावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने मोर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. याच दरम्यान आवाशी येथील अजय लांजेकर आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून खेडच्या दिशेने जात असताना त्यांच्या डोळ्यासमोरच मोराला गाडीची धडक बसली आणि तो जखमी होऊन रस्त्यावर पडला.

हे पाहताच या दोन तरुणांनी तात्काळ आपली गाडी थांबवली आणि त्या जखमी मोराला उचलले. त्याच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घाणेखुंट येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काते यांच्यासोबत मोराला परशुराम हॉस्पिटलमध्ये आणले. येथे येऊन त्यांनी पत्रकारांच्या मदतीने वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी मोराला पुढील उपचारासाठी खेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले.

या जखमी मोरावर उपचार करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे वनविभागाचे कर्मचारी श्री. ढाकणे यांनी सांगितले. मोर जखमी झाला आहे हे पाहून तात्काळ तत्परता दाखवून अजय लांजेकर आणि त्यांच्या मित्राने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या मोराला जीवनदान मिळाले. त्यामुळे पंचक्रोशीतून या दोन तरुणांचे कौतुक होत आहे. या घटनेने वन्यजीवांप्रति असलेल्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 13/Jun/2025